मुंबई : संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्याच देवनार स्मशानभूमीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई होती. ही बाब ‘लोकमत’ने पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नुकतीच पालिकेने या स्मशानभूमीत नव्याने पाईपलाईन टाकत पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. चेंबूरच्या चरई स्मशानभूमीनंतर घाटला गाव, देवनार, बीएआरसी, बीपीटी कॉलनी आणि मानखुर्द परिसरातील रहिवाशांसाठी देवनार गावात ही एकमेव हिंदू स्मशानभूमी आहे. रहिवाशांच्या मागणीवरून २००८ मध्ये पालिकेने ही स्मशानभूमी बांधली. त्यावेळी येथे पालिकेकडून पाण्याचे कनेक्शन देण्यात आले. मात्र गेल्या महिन्याभरापासून या स्मशानभूमीत पाणीच येत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांनी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. त्यातच या स्मशानभूमी परिसरात पालिकेची कर्मचारी वसाहतदेखील आहे. या वसाहतीत १८ कुटुंबे राहत आहेत. त्यांच्याकडेही पाणी येत नसल्याने त्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर काही दिवस त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र तीन-चार दिवसांनी एक टँकर येत असल्याने रहिवाशांचे बरेच हाल होत होते. याबाबत परिसरातील मनसे नेते राजेंद्र नगराळे यांनी पालिकेला पत्र लिहून तत्काळ हा पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी महापालिकेकडे पाठपुरावाही केला होता. मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने येथील पाण्याच्या समस्येचे वृत्त ‘लोकमत’ने २९ जुनच्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ या वृत्ताची दखल घेत दोन दिवसांपूर्वी याठिकाणी नव्याने पाईपलाईन टाकत येथील पाणीप्रश्न कायमचा मिटवला आहे. (प्रतिनिधी)
देवनार स्मशानभूमीत नवी पाईपलाईन
By admin | Updated: July 17, 2015 02:29 IST