Join us

शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमली नवी मुंबई

By admin | Updated: March 16, 2017 03:15 IST

शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनी शहरात उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली. एपीएमसीमध्ये भव्य रॅली व पालखी सोहळा आयोजित केला होता

नवी मुंबई : शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनी शहरात उत्साहामध्ये शिवजयंती साजरी केली. एपीएमसीमध्ये भव्य रॅली व पालखी सोहळा आयोजित केला होता. शिवरायांचे विचार घराघरांमध्ये पोहोचविणे व प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाने शहरात साफसफाई मोहिमेचे आयोजन केले होते. याशिवाय अनेक ठिकाणी चित्रकला व निबंध स्पर्धेच्या माध्यमातून शिवकाल उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी बुधवारी पूर्ण शहर दुमदुमले. शिवसेनेच्या वतीने प्रत्येक नोडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गणेश महांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. शिवाजी महाराज, मावळे यांच्या वेशभूषा, घोडदळ व पायदळासह पूर्ण शिवकाल या सोहळ्यामध्ये पाहावयास मिळत होता. मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार व इतर घटकही सहभागी झाले होते. नेरुळमधील जाणता राजा तरुण मित्रमंडळाने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले अवचितगडावरून शिवज्योत आणली होती. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, पॅन कार्ड व आधार कार्ड शिबिर व पालखी सोहळाही आयोजित केला होता. मंडळाचे अध्यक्ष संजय शेवाळे, कार्याध्यक्ष अजित खताळ, सचिव प्रशांत सोळसकर यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नेरूळ सेक्टर १०मधील शिवशाही मित्रमंडळाने जयभवानी मार्केटजवळ उत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी परिसरातील नागरिकांसाठी मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. तुर्भे इंदिरानगरमध्ये शिवसेनेच्या वतीने लहान मुलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. शिवाजी महाराजांविषयी विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी व त्यांना शिवरायांच्या पराक्रमाविषयी माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तुर्भे नाक्यावर राजू शेख, हनुमान नगरमध्ये तय्यब पटेल यांनी उत्सवाचे आयोजन केले होते. नेरुळ सेक्टर १६, १८मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक काशिनाथ पवार, माजी नगरसेवक सतीश रामाणे हे उपस्थित होते. नेरुळ परिसरात सुनीता रतन मांडवे यांच्या वतीनेही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)उरणमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहातउरण : शिवसेनाप्रणित सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने उरणमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळच्या सत्रात गणपती चौकात शिवप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर उनपच्या विमला तलावातील शिवपुतळ्यास अभिवादन करून पुष्पांजली वाहण्यात आली. या वेळी रायगड उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, सेनेचे उनप गटनेते गणेश शिंदे, उरण पं. स. माजी सभापती विश्वास म्हात्रे, राकेश म्हात्रे, संजय गावंड, विकास भोईर, रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने उरण शहराच्या शाखेपासून शिवपुतळ्याची मिरवणूकही काढण्यात आली होती. ढोल-ताशे आणि विविध वाद्यांवर गुलाल उधळीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अनेक मान्यवरांसह शिवप्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाड शहरासह तालुक्यातील तिथीनुसार आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी चौकातील शिवपुतळ्याची सकाळी जि. प. सदस्य जितेंद्र सावंत यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त मंडळांनी रायगडावर आणलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले. दुपारनंतर शहरातील विविध सार्वजनिक मंडळाच्या सचित्र देखाव्यांसह मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यात मिरवणुकीत मंडळाचे आखाडे लेझीम पथकांसह सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळातर्फे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यात ढोलपथकासह दिंडी पथके व पारंपरिक वेशभूषेतील शिवभक्त व महिला सहभागी झाल्या होत्या. मंडळाचे अध्यक्ष बिपीन म्हामूणकर, दिलीप पवार, विलास कडके, अजय मांगडे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐरोलीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना पुरस्कृत ऐरोली क्र ीडा मंडळ आणि माउली महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या नवी मुंबई जिल्हा संपर्क संघटक संध्या सावंत आणि युवासेनेचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे समन्वयक केतन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र, मतदार नावनोंदणी, पॅन कार्ड शिबिर, आधार कार्ड, आॅनलाइन पासपोर्ट शिबिर, ड्रायव्हिंग लायसन्स, माहिती अधिकार शिबिर, शिवसेना व युवासेना सभासद नोंदणी शिबिर, मॅरेज सर्टिफिकेट, आयटी फाइल रिटर्न, मेडिक्लेम, फूड लायसन्स आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नगरसेवक नामदेव भगत, विभागप्रमुख चंद्रकांत देसाई, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आर. एम. राठोड, संजय काकडे, शहर संघटक मीनाक्षी दांगट, समाजसेवक शरद सावंत, बाळू शिंदे, रवी सावंत, शांताराम सावंत, सुजाता लाड, गीता जांभळे आदी उपस्थित होते.