नवी मुंबई : आचारसंहिता सुरू झाल्यापासून पोलिसांनी आतापर्यंत २३ बेकायदा शस्त्रे जप्त केली आली आहेत. त्यामध्ये ११ बेकायदा शस्त्रे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात शहरात कोणतीही गुन्हेगारी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार आचारसंहिता सुरू झाल्यापासून पोलीस आयुक्तालय हद्दीतून एकूण २३ बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली. परिमंडळ १ च्या पोलिसांकडून ७ तर परिमंडळ २ च्या पोलिसांकडून ५ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तर गुन्हे शाखा पोलिसांनी ११ बेकायदा शस्त्रे जप्त केली आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत चार शस्त्रे जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सीबीडी सेक्टर ३ येथे बेकायदा शस्त्र विक्रीसाठी तरुण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी सापळा रचून एकाला अटक करण्यात आली. हेमंत रवींद्र तांबे (३४) असे या तरुणाचे नाव आहे. झडतीमध्ये त्याच्याकडे १ पिस्तुल, १ देशी कट्टा व ३ काडतुसे आढळून आल्याचे गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. हेमंत हा गोरेगावचा राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी सीबीडी येथे आला होता. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईत गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवारी सकाळी कोपरखैरणे पोलिसांनी घणसोली रेल्वे स्थानक परिसरातून एकाला अटक केली. उमर सन्नी अहमद शेख (२१) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २ पिस्तुले, २ काडतुसे व मॅगझिन जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. उमर हा खैरणे गाव येथील राहणारा आहे. ऐन निवडणूक काळात पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावून शस्त्र जप्त आणि गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहर हे गुन्हेगारांच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. या शस्त्रांशी राजकीय संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.(प्रतिनिधी)
नवी मुंबईत २३ बेकायदा शस्त्रे जप्त
By admin | Updated: October 10, 2014 02:21 IST