Join us  

 नवरंग स्टुडिओ आग : मालकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 9:14 PM

कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर शहाणपण आलेल्या महापालिकेने तात्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

मुंबई - कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर शहाणपण आलेल्या महापालिकेने तात्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मिल कंपाऊंडमधील नवरंग स्टुडिओ आग प्रकरणात अग्निशमन दलाने संबंधितांविरूध्द एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. आग प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये हयगय केल्याने ही दुर्घटना घडल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

लोअर परेल येथे तोडी मिलमध्ये असलेला नवरंग स्टुडिओ गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. गुरूवारी मध्यरात्री या स्टुडिओच्या चौथ्या मजल्यावर अचानक आग लागून चित्रपटाच्या चित्रफितींचा माेठा साठा जळून खाक झाला. ही आग पूर्णता विझविण्यास अग्निशमन दलास 12 तासांचा कालावधी लागला. हा स्टुडिओ बंद असल्याने सुदैवाने याच जीवितहानी झाली नाही. मात्र अग्निशमन दलाने केलेल्या पाहणीत या स्टुडिओमध्ये आग प्रतिबंधक नियम धाब्यावर बसविल्याचे आढळून आले. विभागीय अग्निशमन अधिकारी संपत कराडे यांनी केलेल्या पाहणीत या स्टुडिओमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थाचा साठा असल्याचे दिसून आले. 

चित्रफितींचा मोठा साठा करताना त्याबाबत अग्निशमन दलाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती.  तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपायोजना 2006 अंतर्गत जागेच्या मालकाने काेणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या. ज्वलनशील पदार्शांच्या साठ्यामुळे मानवी जीवितास धोका असतानाही सुरक्षेत हयगय करण्यात आल्याचा ठपका अग्निशमन दलाने चौकशीतून ठेवला आहे. कमला मिल आगीच्या घटनेच्या अनुभवानंतर महापालिकेने झटपट पावलं उचलली आहेत. मिल आगप्रकरणी जागेच्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी पालिकेने पोलिसांकडे आज केली.