Join us

जिथे स्वतःचा हात दिसत नव्हता तिथे पोहोचला नौदलाचा दोरखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहा दहा मीटर उंच लाटा, ताशी ९०-१०० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अशा भयंकर स्थितीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहा दहा मीटर उंच लाटा, ताशी ९०-१०० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे अशा भयंकर स्थितीत एकमेकांना पकडून देवाच्या धावा करण्याशिवाय दुसरा पर्यायच आमच्यासमोर नव्हता. खवळलेल्या समुद्रात मदतीसाठी आलेला नौदलाच्या जवानांना फेकलेला दोरखंड आणि विजेरीचा प्रकाश प्रत्यक्ष देवाचा आशीर्वादच वाटत होता, अशा शब्दात बुधवारी तौक्ते वादळाच्या तडाख्यातून सुखरूप किनाऱ्यावर आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाॅम्बे हाय क्षेत्रात उत्खनन करणारी पी-३०५ ही अजस्त्र तराफा एरवी समुद्राला आव्हान देत कार्यरत असते. त्यावरचे शेकडो हात उत्खननात व्यस्त असतात. तौक्ते चक्रीवादळात उधाणलेल्या समुद्राने मात्र या तराफाचा पालापाचोळा केला होता. चक्रीवादळाच्या पहिल्याच दिवशी तराफा तुटून समुद्रात विलीन झाली. यावरचे २६७ जण कसेबसे मिळेल त्या आधाराने मदतीची वाट पाहत होते. ज्यांना आधाराला काही नव्हते ती मंडळी त्या भयानक वादळात एकमेकांचा हात पकडून दहा ते चौदा तास पाण्यात तरंगत होते. ‘चारी बाजूंनी पाणी होते. प्रचंड लाटा आणि त्यामुळे धडका देणारे पाणी अशा स्थितीत आम्ही दहा-बाराजण वर्तुळात एकमेकांना पकडून होतो. रात्री तर स्थिती आणखी बिघडली. स्वतःचा हातही दिसत नव्हता; पण, तरीही त्या काळोखात शेजारचा पकडलेला हात आम्ही सोडला नाही’, असे ओएनजीसीचे एक कर्मचारी संदीप सिंह यांनी सांगितले. १७ तारखेला सायंकाळी ५ वाजता पाण्यात उडी मारली होती. ते रात्री ११ पर्यंत पाण्यातच होतो, असे सिंह म्हणाले.

तर, तराफ्यावर मेकॅनिकल काम करणारे प्रमोद यांनी १७ मेच्या दुपारी धीर एकवटून समुद्रात स्वतःला झोकून दिले. १८ तारखेला सकाळी ११ वाजता नौदलाच्या हेलिकाॅप्टरने त्यांची सुटका केली. या अपघातात तराफ्याच्या तुटलेला एक भाग रात्री त्यांना येऊन धडकला आणि ते जखमी झाले होते. आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितले की, कसेबसेच वाचलो. देवाचा धावा करत होतो आणि त्याच्या रूपात नौदलाचे जवान आले.

* नौदलाचा प्रत्येक जवान तयार : कॅप्टन एस. सचिन

युद्धनौका असो किंवा व्यापारी जहाज चक्रीवादळात काम करणे अवघडच असते. ताशी शंभरच्या वेगाने वाहणारा वारा आणि वीस-वीस फूट उंच लाटांचे आव्हान मोठे असते. पाऊस, वाऱ्यामुळे दृश्यमानता शून्यावर येते. अशावेळी प्रत्येकापर्यंत पोहचून काम करावे लागते. अशा संकटाचा सामना करण्यासाठी नौदलाचा प्रत्येक जवान तयार असतो. प्रत्येकाला त्याचे प्रशिक्षणच दिले जाते.

..................................................