Join us

नौदल कमांडरच्या पत्नीला अटक

By admin | Updated: December 28, 2014 01:42 IST

नेव्हीनगरमधील बनावट सौंदर्य प्रसाधने उत्पादनप्रकरणी कमांडरची पत्नी सीमा सिंह यांना पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते़

श्रीनारायण तिवारी - मुंबई नेव्हीनगरमधील बनावट सौंदर्य प्रसाधने उत्पादनप्रकरणी कमांडरची पत्नी सीमा सिंह यांना पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते़ त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ ही मुदत संपत असल्याने त्यांना रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे़ मुंबईतील नेव्हीनगरमध्ये वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याच्या घरात ‘बनावट सौंदर्य प्रसाधने’ बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे एफडीएने ३० आॅक्टोबर रोजी टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले. तब्बल दोन महिने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र, ३ डिसेंबर रोजी अखेर अधिकाऱ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाला़ त्यानंतर नौदल अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. संबंधित अधिकाऱ्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्य कार्यालय सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कमांडरची पत्नी सीमा सिंह यांना शुक्रवारी अटक करण्यात आली़ चौकशीत पोलिसांचे समाधान झाले नाही, तर पोलीस कोठडी आणखी वाढू शकते. ज्या कलमांन्वये सीमा सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्यासाठी त्यांना किमान तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असे विधिज्ञांनी म्हटले आहे़