Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसेवक अनंत घोगळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:25 IST

मराठी रंगभूमीच्या विविध प्रांतात मुशाफिरी करणारे नाट्यक्षेत्रातील सच्चे कार्यकर्ते, नाट्यस्पर्धांचे आयोजक म्हणून कार्य बजावलेले व्रतस्थ नाट्यसेवक अनंत घोगळे (८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

मुंबई : मराठी रंगभूमीच्या विविध प्रांतात मुशाफिरी करणारे नाट्यक्षेत्रातील सच्चे कार्यकर्ते, नाट्यस्पर्धांचे आयोजक म्हणून कार्य बजावलेले व्रतस्थ नाट्यसेवक अनंत घोगळे (८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन कन्या आहेत. त्यांच्या निधनाने कामगार रंगभूमी पोरकी झाली असून, नाट्यसेवक हरपल्याची भावना नाट्यसृष्टीत आहे.गिरणी कामगार नाट्यस्पर्धांच्या उज्ज्वल अशा काळात अनंत घोगळे यांनी विविध एकांकिका स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. मुंबईतील प्रत्येक एकांकिका स्पर्धेला त्यांची हजेरी असायची. यातील ८० टक्के स्पर्धांचे आयोजन त्यांचे असायचे.‘बेबंदशाही’ या नाटकात त्यांनी भूमिकाही केली होती. मात्र, ती साकारताना त्यांना तलवार लागून अपघात झाला आणि त्यांच्या आजोबांनी त्यांना रंगमंचावरून एक्झिट घ्यायला लावली. मात्र, त्यामुळे ते नाउमेद झाले नाहीत. त्यांनी व्रतस्थपणे रंगभूमीची सेवा सुरूच ठेवली. तब्बल ६० वर्षांपासून त्यांची ही सेवा अखेरपर्यंत अखंड सुरू होती.१९९३ मध्ये वस्त्रोद्योग विभागातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी नाट्य चळवळीला पूर्णत: वाहून घेतले. मंत्रालयात काम करत असताना केवळ नाट्यक्षेत्राला वेळ देता येणार नाही, म्हणून राजपत्रित अधिकारीपदाची बढती स्वीकारली नाही. मासिके, नियतकालिके, स्मरणिका, दैनिकांतून त्यांनी नाट्यविषयक घडामोडींवर लेखन केले. ‘नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर स्मृती नाट्यसेवा’ पुरस्कार त्यांना मिळाला. अमृतमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात त्यांच्या नाट्यसेवेचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव झाला.