Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालनाट्य संमेलनाच्या आखाड्यात नाट्य परिषद!

By admin | Updated: June 3, 2015 23:55 IST

बालनाट्य संमेलनाच्या आखाड्यात नाट्य परिषद!

बालनाट्य संमेलनाच्या आखाड्यात नाट्य परिषद!
राज चिंचणकर / मुंबई :
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने गाजवणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आता बालनाट्य संमेलनाच्या आखाड्यात उतरली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात सोलापूर मुक्कामी नाट्य परिषदेतर्फे बालनाट्य संमेलन आयोजित करण्यात आले असून, ते तीन दिवस चालणार आहे. आतापर्यंतच्या नाट्य संमेलनांमध्ये केवळ एका विभागापुरत्या मर्यादित असणार्‍या बालरंगभूमी विषयक चळवळीला या संमेलनामुळे मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाचे आयोजन हे स्वतंत्रपणे करण्यात येणार असून, अशाप्रकारचे हे पहिलेच बालनाट्य संमेलन ठरणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने नाट्य परिषदेने या संमेलनाची जबाबदारी उचलली असून, या संमेलनाच्या निमित्ताने नाट्य परिषदेने हाती घेतलेला हा नवा उपक्रम आहे. आजच्या घडीला व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असलेले अनेक कलावंत हे बालरंगभूमीवरुनच आलेले आहेत. बालरंगभूमी हा नाट्यव्यवसायाचा पाया समजला जातो. त्यामुळे नाट्य परिषदेने हाती घेतलेले हे कार्य म्हणजे बालरंगभूमीला केलेला सलाम ठरणार आहे.
बालरंगभूमीचा सांगोपांग आढावा या संमेलनाच्या व्यासपीठावर घेतला जाईल, अशी अपेक्षा आगामी अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यवतुर्ळात व्यक्त होत असून, नाट्य परिषदेला बालरंगभूमीची आठवण असल्याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात येत आहे.