राज चिंचणकर / मुंबईमराठी रंगभूमीच्या इतिहास अग्रस्थानी नाव असणारे ज्येष्ठ रंगकर्मी नटवर्य प्रभाकर पणशीकर यांना अनोखी नाट्य सुमनांजली वाहण्यात येणार आहे. नाट्यसृष्टीचे ‘पंत’ म्हणून आदराने संबोधल्या जाणाऱ्या पणशीकर यांचा १३ जानेवारी रोजी स्मृतिदिन आहे आणि या दिवशी ‘नाट्यसंपदा कलामंच’ ही नाट्यसंस्था पंतांना आदरांजली म्हणून ‘माझी आई तिचा बाप’ हे नाटक रंगभूमीवर आणण्यास सज्ज झाली आहे. या नाट्यकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यात प्रमुख भूमिका रंगवत आहेत. हे दोघे रंगकर्मी या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर प्रथमच एकत्र आले आहेत. अनाथ मुलांनीच आई-बाबांना दत्तक घेण्याविषयी भाष्य करणाऱ्या या नाटकाची मूळ संकल्पना, आतापर्यंत विविध नाटकांतून लक्ष वेधून घेणारी युवा अभिनेत्री रेणुका भिडे हिची आहे.फ्रान्सिस आॅगस्टीन लिखित व सुदेश म्हशीलकर दिग्दर्शित या नाटकात अजित केळकर, पूर्वी भावे आणि सचिन देशपांडे हे कलावंतही भूमिका साकारत आहेत. प्रभाकर पणशीकर यांना नवीन नाट्यकृतीद्वारे आदरांजली अर्पण करण्याची कल्पना निर्माते अनंत पणशीकर यांच्या मनात आली आणि त्यांनी हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे नक्की केले. या आठवड्यात रंगभूमीवर येणाऱ्या नाटकाच्या तालमी सध्या जोरात सुरू आहेत.
नटवर्य प्रभाकर पणशीकर यांना अनोखी नाट्य सुमनांजली..!
By admin | Updated: January 10, 2017 05:27 IST