Join us  

ट्रक मालकांचे 18 जूनपासून बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 6:57 PM

आंदोलनात १८ जूनपासून देशातील माल वाहतूक करणारे सर्व ट्रक बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गूड्स व्हेहीकल ओनर्स असोसिएशनने गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

- चेतन ननावरे

मुंबई : इंधन दर, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रिमियममध्ये होत असलेल्या भरमसाठ वाढीविरोधात देशातील ट्रक मालकांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात १८ जूनपासून देशातील माल वाहतूक करणारे सर्व ट्रक बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गूड्स व्हेहीकल ओनर्स असोसिएशनने गुरुवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.असोसिएशनचे अध्यक्ष बी. चन्ना रेड्डी म्हणाले की, डिझेलचे वाढते दर, टोल शुल्कातील वाढ आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स दराबाबतच्या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केंद्र शासनाला केली आहे. मात्र शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने ट्रक आॅपरेटर्सच्या संघटनेला चक्काजाम आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले आहे.असोसिएशनचे महासचिव राजिंदर सिंग म्हणाले की, डिझेल, टोल आणि थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या समस्येमुळे ट्रक मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत सरकारकडे वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. म्हणूनच बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर ट्रक चालकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे.

...म्हणूनच ट्रक चालकांचे आंदोलन!देशातील ८० टक्के लॉरी आॅपरेटर्स हे १ ते १० ट्रक्सचे मालक आहेत. यांपैकी बरेचसे आॅपरेटर्स व्यवसायिक व स्वयंरोजगार मिळवलेले आहेत.त्यात बहुतेक ट्रक्सना एनबीएफसी किंवा अन्य वित्त संस्थांकडून वित्त सहाय्य देण्यात येते. हे वित्तसहाय्य हायर पर्चेस अरेंजमेंट अंतर्गत करण्यात येत असून मालकांना मासिक हफ्ते नियमितपणे भरावे लागतात.ट्रक्सच्या एकूण परिचालन किंमतीपैकी ६० टक्के किंमतीचा वापर हा डिझेलसाठी केला जातो. गेल्या पाच महिन्यांत डिझलेच्या दरात १७ टक्के वाढ झाली असून गाडीभाड्यात मात्र कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.त्यामुळे ट्रक मालकांचे दिवाळे निघू लागले असून छोट्या ट्रक आॅपरेटर्सचा व्यवसायच धुळीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :मुंबई