Join us  

आरेच्या जैवविविधतेत राष्ट्रीय पक्षी, राज्य फुलपाखरांचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 6:31 AM

आरे वसाहत म्हणजे मुंबईचे ‘फुप्फुस’ म्हणून ओळखले जाते.

- सागर नेवरेकर मुंबई : आरे वसाहत म्हणजे मुंबईचे ‘फुप्फुस’ म्हणून ओळखले जाते. दुग्धव्यवसायाकरिता वसवलेली आरे वसाहत १ हजार २८७ चौरस किलोमीटर परिसरात पसरली आहे. आरे वसाहत हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा दक्षिणेकडचा परिसर असून, शासनाने हा भाग संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन, राज्य फूल तामण, राज्य पक्षी हरियाल, देशातील सर्वात मोठा सर्प अजगर, बिबटे, साधारण १० प्रजातींच्या कोळी इत्यादी पशुपक्ष्यांचा वावर आरेच्या जैवविविधतेत दिसून येतो.विविध प्रकारची हरणे, जसे चितळ आणि भेकर, उदमांजर आणि मुंगसच्या प्रजाती, जंगली मांजर तसेच वानर या भागात आढळतात. या व्यतिरिक्त विविध प्रजातींच्या वन्यजिवांवर येथे संशोधन सुरू आहे. सिकाडा या अतिशय कमी माहिती उपलब्ध असलेल्या कीटकाच्या पाच प्रजाती आरेमधून नोंदविल्या गेल्या आहेत. आरेच्या या जंगलाला बिबट्यांचा अधिवास वाढत आहे. त्यांच्या या वाढत्या अधिवासामुळेच येथील जंगलाला प्रसिद्धी मिळाली आहे.पावसाळ्यामध्ये बेडकांच्या १० ते १२ प्रजाती दिसून येतात. पावसाळ्यामधील विविध प्रकारची रानफुले आणि आळंब्या, उन्हाळ्यामध्ये बहरणारे बहावा, गुलमोहोर आणि सावर, तसेच अनेक हिवाळी पानगळीच्या वनस्पती आरेला विविध छटा देतात.जंगलाचे संवर्धन करणे गरजेचेअलीकडे वाढलेल्या मानवी हस्तक्षेपातून होणारी जंगलतोड, मातीची झीज, वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे होणारा आवाज आणि प्रदूषण यामुळे ही वनसंपदा धोक्यात आलेली आहे. आपल्या राष्ट्रीय संपत्तीचा भाग असणाऱ्या या जंगलाचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही राजेश सानप यांनी भाष्य केले.> स्थलांतरित पक्ष्यांमुळे खुलले निसर्गाचे सौंदर्यपावसात पश्चिम घाटामधून पूर्वेकडे स्थलांतर करणाºया फुलपाखरांचे थवे आरेमध्ये काही काळासाठी उतरतात. युरोपीयन नीलपंख, लाल डोक्याचा भारीट, गुलाबी मैना, बहिरी ससाणा, काळ्या टोपीचा धीवर अशा स्थलांतरित पक्ष्यांच्या विविध प्रजाती हिवाळ्यात दिसून येतात. सर्प आणि पालींच्या जवळपास ५० प्रजातींची नोंदही येथे करण्यात आली आहे, अशी माहिती जीवशास्त्रज्ञ राजेश सानप यांनी दिली. विविध स्थलांतरित पक्ष्यांमुळे येथील निसर्गसौंदर्यात अधिकच भर पडल्याचे पाहायला मिळते.