Join us

नाशिक, मुंबईची सलामी

By admin | Updated: October 6, 2015 00:58 IST

राज्यस्तरीय कबड्डी : धनंजय महाडिक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

कै. वीरसेन पाटील क्रीडानगरी, शिरोळ : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणेद्वारा जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने व बालशिवाजी मंडळ शिरोळ, दत्त महाविद्यालय कुरुंदवाड आयोजित राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेस सोमवारी सायंकाळी प्रारंभ झाला. सलामीच्या सामन्यात मुलींच्या नाशिक संघाने अमरावती संघावर २४ गुणांनी विजय मिळविला, तर मुलांच्या अत्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात मुंबई संघाने औरंगाबाद संघावर अवघ्या एक गुणाने विजय मिळविला. रात्री उशिरापर्यंत सामने सुरू होते.येथील पद्माराजे विद्यालयाच्या प्रांगणातील कै. वीरसेन पाटील क्रीडानगरीत १९ वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खा. महाडिक म्हणाले, कबड्डीमध्ये आधुनिकता आल्याने ग्रामीण भागातील युवक आकर्षित होऊ लागला आहे. त्यामुळे निश्चितच कबड्डी खेळाला चांगले दिवस प्राप्त झाले आहेत. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील होते. उद्घाटनप्रसंगी उमा भोसले, मुक्ता कळेकर, प्रो-कबड्डीपटू सागर खटाळे, कबड्डी असोसिएशनचे संभाजी पाटील, आ. उल्हास पाटील, दरगू गावडे, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, अमरसिंह पाटील, गौतम पाटील, सरपंच सुवर्णा कोळी, आदी उपस्थित होते. प्राचार्य आण्णासो गावडे यांनी स्वागत केले. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. चंद्रकांत गावडे यांनी आभार मानले.दरम्यान, रात्री उशिरा नागपूर विरुद्ध कोल्हापूर मुलांच्या कबड्डी संघात चुरशीचा सामना सुरू होता. कोल्हापूर संघाने ३९ विरुद्ध १२ गुणांनी विजय मिळविला. स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू सुवर्णा बारटक्के, निवड समिती सदस्य अनिल सातव (पुणे), गीता साखरे (औरंगाबाद), शंकर पवार (कोल्हापूर) यांची उपस्थिती आहे. (प्रतिनिधी) स्पर्धेतील अन्य विजयी संघ असे : लातूर (१३) विरुद्ध कोल्हापूर (४७ विजयी), औरंगाबाद (२५) विरुद्ध पुणे (२९ विजयी), नागपूर (१३) विरुद्ध मुंबई (४८ विजयी). मुले विभाग- अमरावती (२६) विरुद्ध लातूर (३०), पुणे गैरहजर असल्याने नाशिक संघ विजयी.