Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाकावाटे घ्या बुस्टर डोस; वर्ष १८ ते ५९ मधील पात्र नागरिकांना मिळणार लस

By संतोष आंधळे | Updated: October 31, 2023 14:49 IST

संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी इन्‍कोव्‍हॅक लसीचा बूस्‍टर डोस घ्‍यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

 मुंबई : मुंबई महानगर परिसरातील  १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बुधवार  पासून नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक कोविड प्रतिबंधक लसीची प्रतिबंधात्‍मक मात्रा (बूस्‍टर डोस) देण्‍यास सुरुवात करण्‍यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. 

महानगरपालिकेच्‍या वतीने मुंबई महानगरातील प्रत्येक प्रशासकीय विभागात एक या नुसार २४ लसीकरण केंद्रांवर दिनांक २८ एप्रिल २०२३ पासून ६० वर्षावरील नागरिकांना तसेच २३ जून २०२३ पासून आरोग्‍य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणा-या कर्मचा-यांना नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक  कोविड - १९ लसीचा  बूस्‍टर डोस देण्‍यात येत आहे. राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनेनुसार, आता  महानगरपालिकेतर्फे बुधवार दिनांक १ नोव्‍हेंबर इन्‍कोव्‍हॅक  ही लस १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिकांना बूस्‍टर डोस म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक बूस्‍टर डोस घेता येईल. 

कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रिकॉशन डोस म्हणून इन्‍कोव्‍हॅकलस देता येणार नसल्‍याचे देखील महानगरपालिका प्रशासनातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी इन्‍कोव्‍हॅक लसीचा बूस्‍टर डोस घ्‍यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई महानगरपालिका