Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या ५८ किलो सोन्याचा लागला छडा

By admin | Updated: July 30, 2015 01:58 IST

नौपाड्यातील एका दरोड्याचा तपास करीत असतानाच ठाणे-नाशिक महामार्गावरील ५८ किलो सोन्याची लूट करणाऱ्या पाच दरोडेखोरांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे

ठाणे : नौपाड्यातील एका दरोड्याचा तपास करीत असतानाच ठाणे-नाशिक महामार्गावरील ५८ किलो सोन्याची लूट करणाऱ्या पाच दरोडेखोरांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिशान ऊर्फ सद्दाम इश्तियाक खान या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन कोटी १८ लाख ८७ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.नौपाडा पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये दाखल झालेल्या दरोड्याचा तपास वागळे इस्टेट युनिटकडून सुरू होता. त्यातील संशयितांचा वाडिवरे येथील दरोड्यामध्ये समावेश असल्याची शक्यता होती. २४ एप्रिल २०१५ रोजी सिकवेल लॉजिस्टीक कंपनीच्या गाडीतून धुळ्याच्या शिरपूर गोल्ड रिफायनरीतून ५८ किलोच्या सोन्याच्या लगडी नेल्या जात होत्या. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाडिवरे फाट्याच्या पुढे नाशिक बाजूकडे लोगान कारमधून पाच जणांच्या टोळक्याने ही गाडी लुटली. गाडीतील लोकांना मारहाण करून त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून हातपाय बांधून लॉकरमधील १५ कोटी ६९ लाख सहा हजारांची सोन्याची बिस्किटे, दोन मोबाइल असा ऐवज लुटला होता. याप्रकरणी नाशिक ग्रामीणच्या वाडिवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील खानचा हरिद्वार येथून २५ जुलै रोजी शोध घेण्यात आला. त्याच्याकडून दोन कोटी ६० लाखांची १० बिस्किटे आणि १२ लाख ५० हजारांच्या रोकडसह तीन कोटी १८ लाख ८७ हजार ७०० चा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याला २७ जुलैला अटक झाली.