Join us

पुढील कार्यवाहीसाठी नरेश गडेकर नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:12 IST

नियामक मंडळ सदस्यांच्या विशेष बैठकीत निर्णयलाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाट्य परिषद अध्यक्षांच्या विरोधात गेलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी, ...

नियामक मंडळ सदस्यांच्या विशेष बैठकीत निर्णय

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नाट्य परिषद अध्यक्षांच्या विरोधात गेलेल्या नियामक मंडळाच्या सदस्यांनी, विशेष बैठकीत ठराव आणून आणि तो बहुमताने मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी व पुढील सभा होईपर्यंत, नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नरेश गडेकर यांची बहुमताने निवड केली.

नियामक मंडळाच्या ३९ सदस्यांची विशेष बैठक गुरुवारी (१८ फेब्रुवारी) यशवंत नाट्यसंकुलातील तालीम हॉलमध्ये घेण्यात आली. यावेळी नियामक मंडळाच्या सदस्यांनी पुढील कार्यवाहीसाठी नरेश गडेकर यांची नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड केली. यावेळी प्रसाद कांबळी हे त्यांच्या अध्यक्षपदाचे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. अध्यक्षपद रिक्त झाल्याने त्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आणि पुढील सभा होईपर्यंत नरेश गडेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीला उपस्थित असलेल्या ३९ सदस्यांपैकी ३७ सदस्यांनी नरेश गडेकर यांच्या बाजूने मतदान केले; तर दोन सदस्य तटस्थ राहिले. पुढील सभा येत्या १५ दिवसांत आयोजित करण्यात येईल. त्यात नियामक मंडळाच्या ५९ सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे, अशी माहिती या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर, सतीश लोटके आदी नियामक मंडळ सदस्यांनी दिली.

नाट्य परिषदेच्या घटनेप्रमाणे नियामक मंडळाची विशेष सभा घेण्याबाबत, नाट्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहांकडे १३ जानेवारी रोजी नियामक मंडळाच्या ३३ सदस्यांनी अर्ज केला होता. घटनेप्रमाणे ३० दिवसांच्या आत सभा घेणे बंधनकारक होते. परंतु अशी सभा आयोजित केली गेली नाही. उलट त्यावर स्थगिती यावी म्हणून न्यायालयात धाव घेण्यात आली. मात्र न्यायालयाकडून अशी स्थगिती न मिळाल्याने, १८ फेब्रुवारी रोजी विशेष बैठक घेण्याचा नियामक मंडळाच्या सदस्यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, गुरुवारी ही बैठक आयोजित करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया घटनेप्रमाणे पार पडली आहे, अशी माहिती नियामक मंडळ सदस्य भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी दिली.

या बैठकीला नरेश गडेकर, सतीश लोटके, सुनील ढगे, संदीप जंगम, दीपक रेगे, आनंद खरबस, भाऊसाहेब भोईर, विजय चौघुले, सविता मालपेकर, सुशांत शेलार, विजय गोखले, सुनील महाजन, योगेश सोमण, विजय कदम, वीणा लोकूर, प्रमोद भुसारी हे आणि इतर मिळून एकूण ३९ नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते.

...........................