Join us  

दहशतवाद्यांनी 1989मध्ये रचला होता 'मातोश्री' बॉम्बनं उडवण्याचा कट: नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 8:58 PM

शिवसेनेचे माजी नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासा केला आहे.

मुंबई- शिवसेनेचे माजी नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून खळबळजनक खुलासा केला आहे. वर्षं 1989मध्ये दहशतवाद्यांनी ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीला बॉम्बनं उडवून देण्याचा कट रचला होता. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही दिवसांसाठी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं होतं, असं राणेंनी आत्मचरित्रातून म्हटलं आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंना फोन करून याची कल्पना दिली होती.नारायण राणेंनी आत्मचरित्रात असंही म्हटलं आहे की, ठाकरे खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यावेळी फुटीरतावादी खलिस्तानीसमर्थक मुंबईसह अनेक शहरात सक्रिय होते. राणेंच्या म्हणण्यानुसार, 19 मार्च 1988मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिथे त्यांनी प्रश्नावलीचं वाटप केलं. त्यात त्यांनी शीख समुदाय फुटीरतावाद्यांना फंडिंग करत राहिल्यास त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात बहिष्कृत केलं पाहिजे. राणेंनी आपलं आत्मचरित्र 'No Holds Barred: My Years In Politics' यामध्ये तीन घटनांचा उल्लेख केला आहे. शिवसेनेचा 1989मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी ठाकरे काहीसे कमकुवत झाले होते. कारण राज्याची सुरक्षा काँग्रेसच्या हातात होती. त्यानंतर बाळासाहेबांनी मातोश्रीची सुरक्षा वाढवली आणि सर्वांना हाय अलर्ट जारी केला.

त्याचदरम्यान नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शरद पवारांनी अचानक फोन केला. त्यात त्यांना लागलीच भेटण्यास बोलावले. विशेष म्हणजे पवारांनी त्यांना एकट्याला येण्यास सांगितले. त्याच दरम्यान पवारांनी उद्धव ठाकरेंना दहशतवाद्यांनी मातोश्रीला उडवून देण्याचा कट आखल्याचं सांगितलं. तसेच ते खलिस्तानी दहशतवादी मुंबईत दाखल झाल्याचीही कल्पना दिली. विशेष म्हणजे मातोश्रीतल्या काही लोकांचाही या कटात सहभाग असल्याचं पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा उल्लेख राणेंनी आत्मचरित्रात केला आहे.  

टॅग्स :नारायण राणे