पेण : श्रीकृष्णाच्या नटखट बाललीला सर्वांच्याच आवडीच्या. विषय, प्रेम, भक्ती, अनुराग, ममता, वात्सल्य, आणि लडीवाळपणाचे बालरूपी बाळकृष्ण आज प्रत्येक घराघरात वावरतो. कृष्णजन्माष्टमीचा हा नयनमनोहर सोहळा पेणच्या शिशुविकास मंदिर प्रशाला व सुमतीबाई देव प्रशालेमध्ये जल्लोषात साजरा झाला.लहानपण देगा देवा, सृष्टीची उत्पत्ती व मानवतेवर प्रेमाचा, समतेचा, बंधुभावाचा, वात्सल्याचा वर्षाव करण्यासाठी पूर्ण पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात नंदाच्या घरी बाळ लीलांद्वारे आपल्या ज्या नटखटतेचे दर्शन घडविले त्यातून राष्ट्र निर्मितीसाठी घडविणारी नवी पिढी, त्या पिढीचे संगोपन, बालहट्ट, व सामाजिक मने जोडणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचे प्रतिक आहे, मुलांवर लहानपणी केले जाणारे संस्कार प्रथम आईकडून होतात. ते संस्कार गिरविताना भगवान श्रीकृष्णांनी मातृप्रेम, बंधुप्रेम, मित्रप्रेम, ख्ोळ, शिक्षण, दुष्टशक्तींचा संहार या साऱ्या घटनांचे कशाप्रकारे निराकरण केले हीच आठव्या अवताराची भव्य दिव्यता आहे. राम आणि कृष्ण भक्तीने अखंड देश व्यापला आहे. तरीही कृष्ण भक्ती व कृष्णलीलांचा जनमानसावर असलेला प्रभाव व त्याचे अनुकरण प्रशालामध्ये संस्कार व सामाजिक ऐक्याचे प्रतिक म्हणून केले जाते. पेणच्या शिशु विकास व देव प्रशाला याबाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. शनिवारी प्रशालेत जन्माष्टमी इव्हेंट स्पेशल म्हणून संपूर्ण बाळकृष्णाच्या अनेक लीलांचा कार्यक्रमांसह दहीहंडी कार्यक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा केला. कृष्ण-राधा, सवंगडी, रासक्रीडा, गोविंदाची गाणी अशा जल्लोषात प्रशालेमध्ये चिमुकल्यांनी अगदी धम्माल उडवून नटखट, बाळगोविंदानी दहिहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका थळे व देव प्रशालेच्या मुख्याध्यापिका वैशाली पोवळे यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. (वार्ताहर)
शाळांतूनही नटखट नंदकिशोरांची धम्माल
By admin | Updated: August 18, 2014 01:12 IST