कार्लेखिंड : आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. येथे संस्कार आणि परंपरेला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक ऋतूमध्ये धार्मिक गोष्टी आखून दिलेल्या आहेत. पैकीच एक म्हणजे नंदी. आपणा सर्वांना माहीत आहेच की, नंदी म्हणजे काय. रोजच आपल्याला पहायला मिळणारा नंदी वेगळा आणि थंडीच्या ऋतूमध्ये घाटमाथ्यावरून आपल्या कुटुंबासहित इतर प्राण्यांसहित कोकणात आगमन करणारा नंदी वेगळा. हे नंदी घेवून फिरणारे कुटुंब प्रत्येक गावामध्ये आपले तंबू उभारून त्या जवळपासच्या गावांमध्ये भल्या पहाटे आपल्या ढोलकीच्या विशिष्ट तालावर ढोलकी वाजवत असतो. सोबत असलेल्या बैलाला छानसा सजवून आपल्या पोषाखात गावोगाव फिरतो. अगदी पूर्वीपासून या नंदीबद्दल ग्रामीण भागात एक आतुरता असते. नंदीवाला आपल्या वाणीतून त्या घरातील लोकांचे गुणगान गातो. तसेच वेगळे पैसे घेवून घरातील कोणा व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्याचे नाव घेत त्या मृत व्यक्तीचा जागर करतो. या घरातील सर्वांना सुखात, आनंदात, ऐशोआरामात ठेव, अशी प्रार्थना आपल्या नंदीजवळ करतो. मग कुणी पैसे आणि तांदूळ देतो किंवा एखादा कपडा देतो. नंदीवाला मिळेल ते स्वीकारतो. जाताना चांगला आशीर्वाद देतो. दुसरे उत्पन्नाचे साधन म्हणजे त्याची घरवाली गावागावातून आपल्या टोपलीमधून सुया, दाबण, पोत अशा विविध बारीकसारीक वस्तू विकत असते. या सर्व मेहनतीतून आपले कुटुंब चालवत असतात.
नंदीचा डेरा दाखल
By admin | Updated: December 2, 2014 22:42 IST