Join us

नांदेड, परभणीतील शेतकरी मुंबईच्या आसऱ्याला

By admin | Updated: June 6, 2015 02:04 IST

सरकारच्या फसव्या योजना, सावकारी कर्जाचा डोंगर... अशा पाशात गुरफटलेला शेतकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुटुंबकबिल्यासह मुंबईत दाखल झाला आहे.

मनीषा म्हात्रे - मुंबईगावात बारा महिने दुष्काळाची झळ, ओसाड नापीक जमीन, सरकारच्या फसव्या योजना, सावकारी कर्जाचा डोंगर... अशा पाशात गुरफटलेला शेतकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुटुंबकबिल्यासह मुंबईत दाखल झाला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत तरी मेहनत फळेल आणि स्वत:सोबत कुटुंबाला दोन वेळची भाकरी मिळेल या आशेने घाटकोपर, भटवाडीतल्या पालिकेच्या मैदानाभोवती नांदेड, परभणीतल्या शेतकऱ्यांचा तांडा पडला आहे. भीषण दुष्काळामुळे गेल्या वर्षी विदर्भ, मराठवाड्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी गाव सोडले आणि नवी मुंबई गाठली. नवी मुंबईतील सानपाडा, वाशी किंवा अन्य स्थानकांलगतच शेतकऱ्यांनी उघड्यावर संसार थाटला. या वर्षी नेमके तेच चित्र घाटकोपरच्या पालिका मैदानात दिसले. हा शेतकरी मुंबईत येऊन वेठबिगारी, मोलमजुरी, बांधकाम मजूर असे मिळेल ते काम करताना दिसत आहे. आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा उद्योग झोपडीदादांनी सुरू केला आहे. मुंबईत पाणी आहे पण ते विस्थापित शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागते. मोकळी जागा पालिकेच्या मालकीची पण त्यासाठी महिन्याकाठी प्रत्येकामागे दोनशे रुपये झोपडीदादांना द्यावे लागतात. पैसे दिले नाहीत तर शेतकऱ्यांचा तात्पुरता संसार रस्त्यावर फेकून दिला जातो. गुंडांना द्यायचे काय? खायचे काय? या विवंचनेत शेतकरी आहेत.खेकड्याचे पाठीवर घर, एकदा पाठ मोडली की संपले, तसे आमचे जीवन झाले, अशी खंत नांदेडचा शेतकरी अंकुश जाधव याने व्यक्त केली. उपाशीपोटी कामाच्या शोधात घरातून बाहेर पडायचे. काम मिळाले तर ठीक. नाहीतर तशीच झोपडी गाठायची. वणवण करून रात्री परतल्यावर डुकरांनी उपसलेली झोपडी, संसार पुन्हा सावरायचा आणि पाणी पिऊन उद्यातरी काम मिळेल, या आशेवर तसेच झोपायचे, हे सांगताना अंकुशचे डोळे पाणावले होते.गावात वीज नाही, पाणी नाही... फक्त निवडणुकीदरम्यान गावाकडल्या खडतर वाटा राजकीय नेत्यांच्या गाड्यांनी प्रकाशमय होताना दिसतात. मात्र एकदा का निवडून आला की पाच वर्षे तोंड दाखवत नाहीत, असे त्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गावाकडे ६ एकर जमीन असलेले तुलसीराम राठोड दुष्काळामुळे शेती सोडून मिळेल ते काम करून दोन पैसे कमावण्यासाठी मुंबईत आले. गावातल्या अन्य शेतकऱ्यांसोबत तेही घाटकोपरच्या भटवाडी मैदानात तात्पुरती झोपडी बांधून राहत आहेत.