खालापूर : अलिबाग येथून पुण्याला जात असताना बोरघाटात झालेल्या भीषण अपघातातून अलिबागच्या माजी नगराध्यक्षा नमिता नाईक बचावल्या आहेत. या अपघातात नाईक यांच्या मर्सिडीस या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नमिता नाईक जखमी झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.अलिबागच्या माजी नगराध्यक्षा नमिता नाईक या अलिबाग येथून पुण्याला शिकत असलेल्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी गुरूवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेने जात होत्या. बोरघाटात वाहतूक पोलीस चौकी समोर ओव्हरटेक करत असताना नाईक यांच्या कारने उभ्या असलेल्या टेम्पोला मागून धडक दिली. यामध्ये नमिता नाईक जखमी झाल्या तर कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.नमिता नाईक या शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांच्या नातेवाईक आहेत. त्यांचे पती अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे या अपघाताची माहिती मिळताच शेकाप व विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी असलेल्या नाईक यांना सुरूवातीला चिंचवड येथील लोकमान्य रूग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हॉल रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात आहे. (वार्ताहर)
नमिता नाईक अपघातात जखमी
By admin | Updated: July 3, 2015 22:56 IST