Join us
Daily Top 2Weekly Top 5

फरीदाबाद येथील वाजपेयी रुग्णालयाचे खान अब्दुल गफार खान सरहद गांधी नामकरण करा : हुसेन दलवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST

मुंबई : खान अब्दुल गफार खान यांच्या नावे हरियाणामध्ये रुग्णालय होते. या रुग्णालयाला केंद्र सरकारने माजी पंतप्रधान अटल ...

मुंबई : खान अब्दुल गफार खान यांच्या नावे हरियाणामध्ये रुग्णालय होते. या रुग्णालयाला केंद्र सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. या रुग्णालयाला पुन्हा खान यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली.

खान अब्दुल गफार खान सरहद गांधी यांची १३१वी जयंती मुंबईत ६ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरहद्द गांधी मेमोरियल सोसायटीचे चेअरमन सय्यद जलालुद्दीन, मुंबई काँग्रेस सचिव सईद जलाऊद्दीन, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला, ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी हुसेन दलवाई म्हणाले की, खान हे भारत-पाकिस्तान फाळणीवेळी देशाची फाळणी होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. ते महात्मा गांधी यांच्यासोबत होते. खान यांचे जीवनचरित्र मराठीमधून पुस्तकाद्वारे आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. हरियाणामध्ये त्यांच्या नावाचे रुग्णालय होते, त्याला केंद्र सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत, या रुग्णालयाला पुन्हा खान साहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी म्हणाले की, सरहद्द गांधी म्हणजेच भारतरत्न खान अब्दुल गफार खान हे पठाण समाजाचे नेते होते. महात्मा गांधींचे ते निकटचे सहकारी होते. त्यांनी खुदाई ई खिदमत ही संघटना भारतात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उभारली होती. भारत - पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर त्यांनी व्यथित होऊन उद्गार काढले की, ‘माझी मरणोत्तर समाधी ही भारत-पाकिस्तानमध्ये न होता अफगाणिस्तानात असावी’. खान अब्दुल गफार खान यांचा जन्म पेशावर येथे झाला होता. त्यांची कारकीर्द नेल्सन मंडेला यांच्याबरोबरची होती. त्यांची कारकीर्द, त्यांचे देशासाठी असलेले योगदान सर्वांना माहिती व्हावे, म्हणून संबंधित ट्रस्टची स्थापना झाली आहे, असे सांगितले.