Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींना विकली जाणार मेट्रो स्थानकांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 05:59 IST

कुलाबा, वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील स्थानकांची नावे विकण्यात येणार आहेत.

योगेश जंगम मुंबई : कुलाबा, वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील स्थानकांची नावे विकण्यात येणार आहेत. मेट्रो-३ मार्गिकेवरील स्थानकाला नाव द्यायचे असेल, तर कोणत्याही संस्था, व्यक्ती अथवा कंपनीला कोट्यवधींचा खर्च करून ते देता येणार आहे. यासाठी एमएमआरसीएलने निविदा मागविल्या आहेत. याद्वारे आता कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाची (प्रॉडक्ट) अथवा कंपनीच्या नावाची जाहिरात करणे शक्य होणार आहे. या योजनेद्वारे महसूल मिळविण्याचा एमएमआरसीएलचा उद्देश आहे.कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला आता गती आली आहे. आत्तापर्यंत ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या संपूर्ण मार्गिकेवर एकूण २७ मेट्रो स्थानके असणार आहेत. २०२१ सालापर्यंत ही मार्गिका सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. या मार्गिकेच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी अशा प्रकारच्या विविध योजना आखण्यात येत आहेत. त्यानुसार, मेट्रो स्थानकाच्या नावांची विक्री केली जाणार आहे.देशातील सर्वात लांबीच्या भूमिगत मार्गिकेच्या स्थानकांना नाव देण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेच्या स्थानकांना नाव देण्यासाठी एक कोटी ते एक कोटी दहा लाखांपर्यंतचा खर्च करावा लागू शकतो. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या दरम्यान मोठ्या प्रमाणावर औद्योगिक संस्था, हॉस्पिटल्स, महाविद्यालये आणि हाउसिंग सोसायट्या आहेत. त्यांच्याजवळून ही मेट्रो धावणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या स्थानकाच्या नावाची विक्री करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार, मेट्रो-३च्या प्रीमियम स्थानकांस एक वर्षासाठी नाव देण्यासाठी एक ते पाच कोटी रुपयांचा खर्च करावा लागू शकतो, तर सीएसएमटी, बीकेसी आणि एअरपोर्ट स्थानकांना नाव देण्यासाठी ५ ते १० कोटी रुपयांचा खर्च करावा लागू शकतो. या मार्गिकेवर दररोज सतरा लाख प्रवासी प्रवास करणार असल्याने, स्थानकाचे नाव विकत घेणाऱ्या कंपनीच्या नावाची चांगली प्रसिद्धी होऊ शकेल, तसेच स्थानकाचे नाव स्थानकाच्या परिसरामध्ये आणि स्थानकावर फलकाद्वारे बसविण्यात येणार असून, प्रत्येक घोषणेमध्येही त्यांचे नाव घेण्यात येणार असल्यानेही त्यांची चांगली प्रसिद्धी होईल, असे एमएमआरसीएलद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या काही स्थानकांना अशा प्रकारे खासगी संस्थांची नावे देण्यात आली आहेत. यामुळे मेट्रो प्रशासनास कोट्यवधींचा महसूल मिळतो. तसेच एमएमआरसीएलनेसुद्धा ही पद्धत अवलंबली असून,महसूल मिळविण्याचा नवीन मार्ग शोधला आहे.>थेट मार्गिकेसाठी नऊ विकासकांनी दाखविले स्वारस्यमेट्रो-३ मार्गिकेच्या स्थानकांपासून भविष्यात थेट कार्यालय किंवा घर गाठता येणार आहे. एमएमआरसीएलने यासाठी निविदाही काढल्या आहेत. प्रस्तावित असलेल्या मेट्रो-३ मार्गिकेच्या स्थानकापासून कंपनी अथवा एखाद्या गृहप्रकल्पाकडे थेट जाणारी स्वतंत्र मार्गिका जर कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हवी असेल अथवा एखाद्या विकासकाला थेट आपल्या प्रकल्पापर्यंत जाणारी मार्गिका हवी असल्यास, ते त्या मार्गिकेचा खर्च करून ही मार्गिका तयार करू शकतात. यासाठी नऊ विकासकांनी या योजनेमध्ये स्वारस्य दाखविले आहे.