Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या नावाखाली गंडा

By admin | Updated: November 14, 2015 02:02 IST

राजस्थानमधील एका मंदिराच्या बांधकामासाठी १० लाखांची देणगी गोळा करून सहा आरोपींनी पळ काढल्याची घटना एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मुंबई : राजस्थानमधील एका मंदिराच्या बांधकामासाठी १० लाखांची देणगी गोळा करून सहा आरोपींनी पळ काढल्याची घटना एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी दिनेशकुमार शहा या व्यापाऱ्याने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. राजस्थान येथील रहिवासी असलेल्या शहा यांचा मूलजी जेठा मार्केटमध्ये होलसेल कपड्यांचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे दोन इसम आले. गावाकडे एका मंदिराच्या दुरुस्तीसाठी त्यांनी दहा लाखांचा खर्च असल्याचे सांगितले. याबाबत आरोपींनी एका बड्या व्यापाऱ्याशी शहा यांचे बोलणे करून दिले होते. त्यानुसार शहा यांनी या आरोपींना दहा लाखांची रक्कम दिली. मात्र हे पैसे मंदिरासाठी पोहोचलेच नसल्याचे शहा यांना समजताच त्यांनी याबाबत एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही देणगी जमा करण्याचे काम याच परिसरात राहणारे पारसमल कोठारी आणि विक्रम कोठारी यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. मात्र त्यांच्याकडून पोलिसांना काहीच धागादोरा मिळाला नाही. दरम्यान, पोलिसांना खबऱ्याकडून एका आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा पारसमल आणि विक्रम यांच्या सांगण्यावरून या पैशांचा अपहार केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करत या आरोपीला अटक केली. तसेच त्याच्याकडून एक लाखाची रक्कमदेखील हस्तगत केली आहे. अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)