Join us

सी लिंकला लोकनेते दिबांचे नाव द्या

By admin | Updated: December 21, 2014 23:17 IST

कोकणच्या विकासाचे नवे पर्व ठरणाऱ्या आणि तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार ठरणा-या न्हावा-शिवडी सी लिंकला प्रकल्पग्रस्तांचे लढावू नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव

उरण : कोकणच्या विकासाचे नवे पर्व ठरणाऱ्या आणि तिस-या मुंबईचे प्रवेशद्वार ठरणा-या न्हावा-शिवडी सी लिंकला प्रकल्पग्रस्तांचे लढावू नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव आज जासई येथे झालेल्या सी लिंकबाधित प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत घेतला.या बैठकीत शुक्रवारी सिडकोने दिलेल्या पॅकेजचा प्रस्ताव आणि इतिवृत्तावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून अखेर सी लिंकसाठीच्या जमीन मोजणीला परवानगी देण्याचे ठरविले, मात्र सिडको आणि एमएमआरडीए केवळ आश्वासने देवून प्रकल्पग्रस्तांना झुलवणार असेल तर मात्र कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाला शेतकरी संमती देणार नसल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. प्रत्येक बाधित गावाला किमान ५ कोटीचा विकास निधी आणि गावाजवळ निर्माण होणारी कामे स्थानिकांनाच मिळाली पाहिजेत, अशी मागणी या बैठकीत न्हाव्याचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी लावून धरली. ही मागणीही सिडको आणि एमएमआरडीएकडे मांडली जाईल, असे यावेळी ठरले. न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्पबाधितांसाठी सिडकोने साडेबावीस टक्केचे दिलेले आश्वासन मान्य करायचे किंवा कसे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज जासईच्या हुतात्मा मैदानात एक जाहीर सभा घेण्यात आली. प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी यापूर्वीच न्हावा शिवडी सी लिंक प्रकल्पाच्या जमीन मोजणीला सहमती दर्शविलेली असताना ही सुरेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची लढाई यशस्वी झाल्याचे ठरवून या बैठकीत न्हावा-शिवडी सी लिंक गव्हाण जासई चिर्ले प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि सल्लागार महेंद्र घरत यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. (वार्ताहर)