मुंबई : मुंबई आणि उपनगरातील नाल्यांच्या सफाईत झालेल्या घोटळ्याप्रकरणी कंत्राटदारांसह आता अधिकाऱ्यांभोवतालचा फार्स अधिक वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ५४ पैकी तब्बल ३२ कंत्राटदारांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.पावसाळ्यादरम्यान झालेल्या नालेसफाईची चौकशी करण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांनी उपायुक्त प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. समितीचा अहवाल स्थायी समितीकडे सादर झाला असून, त्यात नऊ कंत्राटदारांच्या कामाची चौकशी करण्यात आली आहे. तर उर्वरित कंत्राटदारांची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.महापालिकेने मुंबई आणि उपनगरातील छोटे व मोठे नाले साफ करण्यासाठी तब्बल ३२० कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. पावसाळ्यापूर्वी ७० टक्के, पावसाळ्यात २० टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के असे नालेसफाईच्या कामाचे स्वरूप होते. प्रत्यक्षात कंत्राटदारांनी नाल्यातील गाळ वाहून नेताना दाखविलेली वाहने, गाळ टाकण्यात आलेले ठिकाण, गाळाचे प्रमाण अशा अनेक बाबतीत हेराफेरी केल्याचे अहवालातून समोर आले आहे.महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असतानाच यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही उडी घेतली आहे. नालेसफाईचा हा फक्त एका वर्षातला घोटाळा आहे. गेल्या दहा वर्षांतील नालेसफाईची चौकशी केल्यास यापेक्षाही अधिक मोठा घोटाळा समोर येईल. त्यामुळे दहा वर्षांतील नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या कंत्राटदारांवर कुणाचा वरदहस्त आहे, याचीही विशेष चौकशी पथकाद्वारे निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
नालेसफाईच्या घोटाळ्याचा फार्स
By admin | Updated: September 5, 2015 02:10 IST