Join us

सर्वत्र नालेसफाई असमाधानकारक

By admin | Updated: June 13, 2014 01:16 IST

नालेसफाईची कामे समाधानकारकपणे सुरू असल्याचा कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला

कल्याण : नालेसफाईची कामे समाधानकारकपणे सुरू असल्याचा कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला असून गुरुवारच्या पाहणी दौऱ्यात पहिल्या टप्प्यातील कामेही समाधानकारक झाली नसल्याचे समोर आले आहे. विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे आणि आघाडीच्या सदस्यांनी केलेल्या दौऱ्यात ही वस्तुस्थिती दिसून आली असून सफाई योग्य प्रकारे न झाल्याने पावसाळ्यात पाणी साचून ते नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती राणे यांनी व्यक्त केली.केडीएमसी परिक्षेत्रात लहान-मोठे ४७ नाले असून नाल्यांच्या सफाईसाठी प्रशासन यंदा एक कोटी ६२ लाख रुपये खर्च करणार आहे.नालेसफाईच्या कामांना १९ मेपासून प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील कामे ५ जूनपर्यंत मार्गी लावू, असा दावा जलनि:सारण विभागाने केला होता़ परंतु, पहिल्या टप्प्यातील कामे अद्यापही अपूर्ण आहेत. दरम्यान, गुरुवारी विरोधी पक्षनेत्यासह काँगे्रसचे गटनेते तथा जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, नगरसेवक नवीन सिंग, उदय रसाळ, शारदा पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, नगरसेवक निलेश शिंदे यांनी केलेल्या दौऱ्याच्या वेळी कार्यकारी अभियंता रवींद्र जौरस आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. कल्याण पश्चिमेतील जरीमरी नाला, पूर्वेकडील लोकग्राम नाला, काटेमानिवली, विठ्ठलवाडी तर डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर, नांदिवली आणि पश्चिमेकडील कोपर रोड नाला आदी मोठ्या नाल्यांची या वेळी पाहणी केली. यात साठलेला कचरा, उगवलेली छोटी झाडे, नाल्यालगत साचलेला गाळ पाहता नालेसफाईची पहिल्या टप्प्यातील कामेही योग्य प्रकारे न झाल्याचे समोर आले़ पहिल्या टप्प्यात ६० ते ७० टक्के कामे होतील, असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, प्रत्यक्षात २० टक्केच काम झाल्याचे दिसल्याने याप्रकरणी जौरस यांना जाब विचारला. प्रशासनाबरोबरच सत्ताधाऱ्यांचा या कामांवर अंकुश नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा विरोधकांचा आरोप आहे. नालेसफाईची कामे कागदावरच दाखवली जात असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पोटे यांनी केला. १३ जूनला होणाऱ्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)