भिवंडी : गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्यात पालिकेस अपयश आले आहे. मात्र ही तांत्रिक बाब गृहीत धरून त्याची निविदा काढली जात असल्याने त्याचा पालिकेस आर्थिक भुर्दंड बसत असून काही नाल्याच्या परिसरांतील नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ६ जून पर्यंत नालेसफाईची अंतिम तारीख असताना शहरातील नाले अर्धवट स्थितीत साफ झाले आहेत, त्याकडे नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. भिवंडी महानगरपालिकेचे बांधकाम विभाग या पूर्वी नालासफाईच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीची सफाई करीत होती. वास्तविक हे स्वच्छतेचे काम स्वच्छता विभागाचे असताना बांधकाम विभागाने या कामात जाणीवपूर्वक हस्तक्षेप केला होता. या वर्षी स्वच्छता विभागाकडून नालासफाईचे काम होत असून एकूण सहा ठेकेदारामार्फत नालेसफाईचे काम होत आहे. प्रभाग समिती क्र.१ मधील भाग क्र.१ चा ठेका बुबेरे अॅण्ड असोसिएट यांना ११ लाख ५५ हजार ४३५ रूपयांना व भाग क्र.२ चा ठेका २२ लाख ९२ हजार ८२० रूपयांना देण्यात आला आहे. प्रभाग समिती क्र.२ प्रीन्स इन्फ्रा यांना २२लाख ३२ हजार ४७८रू. , प्रभाग समिती क्र.३ बुबेरे अॅण्ड असोसिएट १८ लाख ६९ हजार ४६७ रू.,प्रभाग समिती क्र.४ बुबेरे अॅन्ड असोसिएट १८ लाख ४८ हजार ०१५रू.,प्रभाग समिती क्र.५ शिवमर्दन म.का.सह.संस्था २२ लाख २हजार ४६ रू.अशा प्रमाणे दिले आहेत. सदर ठेकेदारांना ६ मे रोजी कार्यादेश दिलेले असून आजही त्यांच्या कामात प्रगती नाही. नाल्यांचा आंतील भाग पूर्णत: साफ केलेला नसून दर्शनी भाग साफ करून त्याचा कचरा नाल्यालगत टाकलेला आहे. तो पावसांत पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. प्रभाग समिती क्र. ५ मधील नझराना नाल्यावर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने भाजीमंडई बांधल्याने तेथील नाला योग्य प्रकारे साफ होत नाही. त्यामुळे तिनबत्ती ते शिवाजीनगर, ठाणगेआळी व नझरानाटॉकीज पर्यंत दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे शिवाजीनगरमध्ये असलेले निजामपूर पोलीस स्टेशन नेहमी पाण्याखाली येते.या घटनेमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. बांधकाम विभागाच्या अशा गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत असल्याने आयुक्तांनी ही बाब गंभीरपणे घेऊन संबधीत अतिक्रमणे दूर करावी व नागरिकांचे होणारे नुकसान टाळावे,अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
नालेसफाई अर्धवट स्थितीत
By admin | Updated: May 27, 2014 01:46 IST