Join us

नग्न फोटो मागवणारा गजाआड

By admin | Updated: August 20, 2015 02:06 IST

लग्नाला नकार देणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला एका माथेफिरूने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून रिव्हॉल्वरचा फोटो पाठवत तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली

मुंबई : लग्नाला नकार देणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला एका माथेफिरूने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून रिव्हॉल्वरचा फोटो पाठवत तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच नग्न फोटो पाठविण्यासाठी बळजबरी केली. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी गेल्या आठवड्यात कांदिवली पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर क्राइम ब्रँच कक्ष ११च्या मदतीने या आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. बादल आया (२३) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो मूळचा बडोद्याचा राहणारा आहे. कांदिवली पश्चिम परिसरात त्याचे मामा राहतात. त्यांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय होता. जिथे हा माथेफिरू काम करीत होता, त्या परिसरात पीडित तरुणी राहते. चार वर्षांपूर्वी तिची मैत्री आयासोबत झाली. हे दोघे एकमेकांना भेटायचे, तसेच फोनवर त्यांचे गप्पा मारणे सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आया या तरुणीला लग्नाची मागणी घालत होता, ज्याला तिच्या घरच्यांचा नकार होता. आयाने या तरुणीला रिव्हॉल्वरचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपने पाठवून तिचा नग्न फोटो पाठविण्यास सांगितले. फोटो न पाठवल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना या बंदुकीने ठार मारून स्वत:देखील आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यानुसार या तरुणीने स्वत:चे तीन ते चार फोटो पाठविले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला लग्नासाठी दबाव टाकू लागला. पोलिसांनी जप्त केलेल्या त्याच्या मोबाइलमध्ये असलेल्या फोटोत ही तरुणी ओक्साबोक्सी रडताना दिसत आहे. त्यानुसार हे फोटो तिला बळजबरीने काढण्यास भाग पाडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयाला कक्ष ११चे पोलीस शिपाई राजू गारे आणि संतोष देसाई यांनी कांदिवली परिसरातूनच ताब्यात घेतले. तो बडोद्याला फरार होण्याच्या तयारीत होता, अशी माहिती क्राइम ब्रँचच्या कक्ष ११चे प्रमुख चिमाजी आढाव यांनी दिली. (प्रतिनिधी)