द्रोणागिरी परिसरातील आयओटीएल कंपनीची पाइपलाइन फोडून कंपनीसमोरच होणारी नाफ्ता या ज्वालाग्राही रसायनाची चोरी पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणली आणि कंपनीचे अधिकारी हादरून गेले. कारण पकडलेल्या टँकरमध्ये तब्बल २0 हजार लीटर नाफ्ता सापडला होता. अवघ्या एका ठिणगीने कित्येक किलोमीटरचा परिसर जाळून टाकण्याची तीव्रता नाफ्त्यामध्ये आहे. अनेक कंपन्यांमध्ये बायो प्रॉडक्ट म्हणून नाफ्ता वापरला जातो. सध्या इंधन भेसळ करणाऱ्या माफियांकडून पेट्रोल, डिझेलमध्ये सर्रास त्याचा वापर केला जातो. नाफ्त्याची घनता कमी असल्याने पेट्रोलमध्ये त्याची भेसळ झाल्यानंतरही ती ओळखता येत नाही. मात्र नाफ्ता हा अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याची उघड्यावर वाहतूक अथवा साठा करणेदेखील तितकेच घातक आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी नाफ्त्याच्या बेकायदा धंद्यात असलेल्यांनी पनवेल, उरण परिसरात आपले बस्तान मांडले आहे.द्रोणागिरी येथील आयओटीएल कंपनीसमोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या झाडीमध्ये दलदलीच्या भागात अनेक वर्षांपासून चोरीचा हा प्रकार चालायचा. पाइपला लहानसे छिद्र पाडून बसवलेल्या व्हॉल्वमधून ही नाफ्ताचोरी केली जायची. रात्रीच्या वेळेस छोट्या पाइपद्वारे हा नाफ्ता कंटेनरमध्ये लपवलेल्या टाकीमध्ये भरला जायचा. त्यानंतर नवी मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचा पुरवठा केला जायचा. नाफ्ता असलेला असाच एक टँकर महापे एमआयडीसीत आल्याचे समजताच पोलिसांनी छापा घातला. या वेळी टँकरमध्ये २० हजार लीटर नाफ्ता असल्याचे समजताच पोलिसांनाही घाम फुटला. या टँकरचा अपघात झाला असता अथवा त्यावर एक ठिणगी पडली असती तर सुमारे दोन किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त झाला असता. पोलिसांचा तपास थेट आयओटीएल कंपनीच्या दारापर्यंत पोहोचला. त्यामुळे कंपनी अधिकाऱ्यांच्याही पायाखालची वाळू सरकली. कंपनीच्या दारातच पाइपमधून नाफ्ता चोरीला जात असतानाही त्याची चाहूल कोणालाच लागलेली नव्हती. नाफ्ताचोरीच्या या प्रकारामुळे कंपनीच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाफ्ता चोरताना तेथे दुर्घटना घडली असती तर अवघ्या ५०० मीटर अंतरावरील कंपनीला धोका निर्माण झाला असता, शिवाय संपूर्ण द्रोणागिरी, उरण परिसरावर संकट आले असते. पोलिसांनी तत्काळ आयओटीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देत नाफ्ता माफियाने तयार केलेला व्हॉल्व बंद केल्याने संभाव्य संकट टळले. यापूर्वी ठिकठिकाणी चोरलेला नाफ्ता महापे, रबाळे, तळोजा येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये साठवला जायचा. त्यावर कारवाया होऊ लागल्याने नाफ्ता माफियांनी थेट द्रोणागिरी व उरण परिसरातच बस्तान मांडले आहे. गेल्या काही वर्षांत उरण परिसरातील चार ठिकाणी पोलीस कारवाई झाली असली तरी स्थानिक पोलिसांचीही भूमिका संशयास्पद आहे.थेट कंपन्यांमधून नाफ्ताचोरी करून ते पेट्रोल भेसळबाजांपर्यंत पोहोचवण्याचे एक रॅकेट पद्धतशीरपणे सुरू आहे. या माफियांना पोलीस आणि राजकारण्यांचा वरदहस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. आयओटीएल कंपनीसमोरील नाफ्ताचोरीचा मुख्य सूत्रधार हा उरण तालुक्याचा राजकीय पदाधिकारी आहे. त्याने आयओटीएल कंपनीसमोरच अनधिकृत कार्यालय थाटलेले आहे. याच कार्यालयाच्या पाठीमागे दलदलीच्या भागात आयओटीएल कंपनीच्या पाइपला छिद्र पाडण्यात आले. त्यानुसार कार्यालयासमोर कंटेनर उभे करून त्यात लपवलेल्या टँकरमध्ये नाफ्ता भरला जायचा. या प्रकरणात संबंधित पक्षाच्या बड्या नेत्यांचाही हात असण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे त्यात नाफ्त्याच्या भेसळीचे प्रमाणही वाढले आहे. पेट्रोलचे दर सध्या ६९ रुपये लीटर असताना नाफ्ता हा ४८ ते ५० रुपये लीटर दराने विकला जातो. त्यानुसार भेसळ माफियांकडून ७० टक्के पेट्रोलमध्ये ३० टक्के नाफ्त्याची भेसळ केली जाते. अशा प्रकारे जादा नफा मिळवण्यासाठी अनेक पेट्रोल पंप चालकदेखील या रॅकेटमध्ये सहभागी असावेत. परिणामी भेसळयुक्त पेट्रोल वापरल्याने वाहनांच्या इंजिनावर परिणाम होऊ शकतो. नाफ्त्याच्या अतिज्वलनशीलतेमुळे वाहनालाही आग लागू शकते. मात्र नाफ्ता माफियांचा नागरिकांच्या जिवाशी मांडलेला खेळ सुरूच आहे.
नाफ्ता माफियांमुळे द्रोणागिरी परिसर गॅसवर
By admin | Updated: March 25, 2015 01:04 IST