Join us  

केवळ बसण्याच्या शैलीमुळे मुंबई पोलिसांनी उलगडले हत्येचे गूढ

By मनीषा म्हात्रे | Published: January 28, 2018 8:16 AM

तुटलेले दात, हताशावस्थेत बसण्याची स्टाईल आणि उंचीने बुटका, या तुटपुंज्या माहितीवर नागपाडा पोलिसांनी हत्येचे गूढ उलगडले.

मुंबई : तुटलेले दात, हताशावस्थेत बसण्याची स्टाईल आणि उंचीने बुटका, या तुटपुंज्या माहितीवर मुंबईतील नागपाडा पोलिसांनी अन्वर ताहद युसुफ खान उर्फ अन्वर हटेला (३५) याच्या हत्येचे गूढ उलगडले आहे. या प्रकरणी मोहम्मद शेहजाद शेख उर्फ मुन्ना अन्सारी (६०) याला बेड्या ठोकण्यात आल्या. अटकेनंतर ‘साहब सिर्फ सबक सिखाना था... गलती हो गई’ असे उद्गार अन्सारीकडून निघाले.गेल्या काही दिवसांपासून हटेला त्याला चिडवत होता. ऊठबस त्याची टिंगलटवाळी करायचा. यालाच वैतागून त्याने मध्यरात्रीच्या सुमारास जवळील दगड त्याच्या डोक्यात घातला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच तो मृतदेहाशेजारी बराच वेळ बसून होता. अंधारात फक्त त्याची बसण्याची शैली प्रत्यक्षदर्शींनी हेरली आणि पोलिसांनी त्याला पकडले.अन्सारी हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. देशीचे दारूचे व्यसन असलेला अन्सारी रात्रीच्या अंधारात पदपथावर झोपलेल्या लोकांच्या खिशातून पाकीट, मोबाइल चोरी करत असे. १ जानेवारी रोजी छोटा सोनापूर परिसरात अन्सारी त्याच्या मित्रांसोबत दारू पीत बसला होता. त्याच दरम्यान मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली. मात्र, त्याच्या दुस-याच दिवशी हटेला याने ‘क्या भाई आजकल थंडा है.. मजबूत नहीना पडी’ म्हणत चिडविण्यास सुरुवात केली. हे चिडवणे त्याचे रोजचेच झाले होते. त्यामुळे हटेला याला धडा शिकवायचा असे ठरविले होते. त्याने हटेला कुठे जातो, कुठे झोपतो, याची माहिती काढली.९ जानेवारीच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास अन्सारीने त्याला छोटा सोनापूर परिसरात निद्रावस्थेत पाहिले. त्याचा राग आणखीन वाढला. त्याने जवळील दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. जोराच्या आवाजाने त्याच्या शेजारी झोपलेल्यांनी पळ काढला. हटेलाचा मृत्यू झाला हे अन्सारीच्या लक्षात येताच तो भानावर आला. बराच वेळ पश्चात्तापाच्या भावनेने मृतदेहाजवळ थांबल्यानंतर तो निघून गेला.१० जानेवारीला सकाळच्या सुमारास हटेलाच्या मृतदेहाची माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. हटेला हा अभिलेखावरील आरोपी होता. पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्रा, एसीपी नागेश जाधव, वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मिलिंद हिवरे, हवालदार हांडे आणि नाईक यांनी आरोपीचा शोध सुरू केला. कुठलाच पुरावा हाती नसताना आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.अंधारात फक्त त्याचे तुटलेले दात, बुटका आणि हताशावस्थेत बसलेला एक इसम एवढीच माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी दीडशे ते दोनशे जणांची चौकशी केली. अखेर अन्सारीच्या बसण्याच्या स्टाईलमुळे तो पोलिसांच्या हाती लागला.

टॅग्स :गुन्हामुंबईअटकखूनमुंबई पोलीस