Join us

पोलिसांनाच फसवणारे मायलेक गजाआड

By admin | Updated: April 23, 2016 02:32 IST

मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजात मुलाच्या जन्मतारखेचा खोटा दाखला दाखवून त्याला अल्पवयीन भासवणाऱ्या आईला आणि तिच्या मुलाला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली

मुंबई : मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजात मुलाच्या जन्मतारखेचा खोटा दाखला दाखवून त्याला अल्पवयीन भासवणाऱ्या आईला आणि तिच्या मुलाला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेला आरोपी मुलगा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात सात ते आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी वडाळा भागातील संगम नगर परिसरात पोलीस गस्त घालत असताना अय्याज कादरी (२०) हा आरोपी तलवार घेऊन जाताना दिसला. त्यांनी या आरोपीला थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पोलीस ठाण्यात आणले.काही वेळातच त्याची आई कमरुनिस्सा कादरी ( ५१) ही पोलीस ठाण्यात पोहचली. आपला मुलगा अल्पवयीन असून त्याला सोडून द्या, अशी विनंती तिने पोलिसांना केली. तसेच त्याचा शाळेचा दाखल देखील तिने पोलिसांना दाखवला. यामध्ये तो १७ वर्षांचा असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बालगुन्हेगार म्हणून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याची तयारी केली. मात्र आरोपी महिलेने पोलिसांना सादर केलेल्या शाळेच्या दाखल्यामध्ये खाडाखोड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ शाळेशी संपर्क साधला असता, आरोपीचे वय २० वर्षे असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी या आरोपीसह त्याच्या आईवर देखील गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. (प्रतिनिधी)