ठाणे : अंबरनाथच्या खून आणि जबरी चोरीच्या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने छडा लावला आहे. निहारीका साळुंखे हिच्याकडे चोरी केल्यानंतर हा प्रकार उघड होऊ नये म्हणून तिची मावस बहिण ज्योती शिकरे - साळुंखे हिने आपल्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने तिचा खून केल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आधी खुन्यांचा माग मिळाल्यावर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्याचे उपायुक्त पराग मणेरे यांनी सांगितले.विनयकुमार मेहरा, ज्योती साळुंखे आणि नसीम शेख रा. मुंब्रा अशी याप्रकरणी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. अंबरनाथ पूर्वमधील ‘लक्ष्मीछाया’ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या निहारिकाचा १८ मार्च रोजी खून झाला होता. त्यादिवशी दुपारी २.३० वा. च्या सुमारास शिक्षिका असलेली तिची आई शोभा घरी आली तेंव्हा हात पाय बांधलेल्या स्थितीत रक्ताच्या थारोळयातील मृतदेह त्यांना दिसला. तिचा गळाही चिरलेला होता. तर घरातील सोने चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही, मोबाईल असा साडे तीन लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. शिवाजीनगर आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते. सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हसरुद्दीन शेख, युवराज सालगुडे, उपनिरीक्षक उदय साळवी हे पथक तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या तिघांना या पथकाने अटक केली. ज्योती ही निहारिकाची मावस बहिण आहे. तिचे यापूर्वी दोन विवाह झाले. विनयकुमार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो आणि नसीम हे एकमेकांशी लीव्ह ईन रिलेशनशीपमध्ये राहतात. पैशांची चणचण असल्याचे ज्योतीने या दोघांना सांगितले. ज्यांच्याकडे पैसे आणि दागिने असतील अशांची यादी आम्हाला दे, असे सांगून त्यांच्याकडे दरोडा टाकण्याचा प्रस्ताव या दोघांनी तिच्यापुढे ठेवला. तेंव्हा तिने आपल्याच मावशीचे घर या दोघांना दाखविले. पूर्ण तयारीनिशी ते तेथे गेले तेंव्हा तिथे निहारीका होती. बहिण घरी आल्यामुळे तिला कोणावरही संशय आला नाही. तिने त्याना चहादेखील केला. तो प्यायल्यानंतर त्यांनी घरातील दागिन्यांची चोरी करून घडल्या प्रकाराची इतरत्र वाच्यता होऊ नये म्हणून तिघांनी मिळून घरातल्याच सुरीने तिचा खून केल्याची त्यांनी कबुली दिली. (प्रतिनिधी)