Join us

माझी नदी, माझी जबाबदारी : नदीसाठी जोडले गेले ५० हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इकॉलॉजिकल सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी २०१४ मध्ये जीवित नदीची स्थापना केली असून, लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन संकल्पना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इकॉलॉजिकल सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी २०१४ मध्ये जीवित नदीची स्थापना केली असून, लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन संकल्पना रुजविली. मुळा, मुठा, राम नदीवर जीवित नदीचे काम सुरू आहे. जीवित नदीशी संलग्न काही नदीयोद्धे इंद्रायणी व पवना नद्या, मीना नदी, वेदावती नदी, उल्हास नदी आणि तेरेखोल नदी यावर काम करत आहेत. जीवित नदीमार्फत मुठाई रिव्हर वॉक, दत्तक घेऊया नदी किनारा, घातक रसायनविरहित जीवनशैली, मुठाई नदी महोत्सव, नदीकाठी नदीसाठी हे उपक्रम राबविले जातात आणि याद्वारे गेल्या ६ वर्षांत ५० हजार नागरिक जोडले गेले आहेत.

नदी संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी आणखी आवाहन करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये राम-मुळा नद्यांच्या संगमावर सुरू असलेले अनधिकृत वाळू उत्खनन उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत जीवित नदीचा सहभाग होता. जीवित नदीच्या कार्यकर्त्यांनी एप्रिलपासून या कामावर लक्ष ठेवले होते. हा नदी संगमावरचा उत्कृष्ट नैसर्गिक नदीकाठ वाचवण्यासाठी वैशाली पाटकर, पुष्कर कुलकर्णी जीवित नदी आणि औंध, बाणेर, पाषाण, पिंपळे निलख यांनी मिळून हे काम केले. यासाठी महानगरपालिका, जिल्हाधिकारी, पोलीस यांच्याबरोबर पाठपुरावा करण्यात आला.

हे सर्व काम सुरू असतानाच भारतीय नदी दिनाच्या औचित्याने जीवित नदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनला भगीरथ प्रयास सन्मान २०२० मिळाला आहे. इंडिया रिव्हर्स फोरमतर्फे नदी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना भगीरथ प्रयास सन्मान देऊन गौरविले जाते. जीवित नदीच्या संस्थापक-संचालक शैलजा देशंपाडे हा सन्मान स्वीकारताना म्हणाल्या की, आमच्याशी संलग्न सर्व संस्था तसेच भारतातल्या वेगवेगळ्या भागांत नद्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व नदीयोद्ध्यांना हा सन्मान अर्पण आहे. नद्यांच्या रक्षणासाठी लढणारे आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांचाही सन्मान करण्यात आला.