Join us

खांदा वसाहतीत लवकरच ‘माझं वाचनालय’

By admin | Updated: May 18, 2015 22:42 IST

तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर सर्वांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता खांदा वसाहतीत जवळपास शंभर सुशिक्षित व्यक्ती एकत्र आल्या आहेत.

पनवेल : तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर सर्वांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता खांदा वसाहतीत जवळपास शंभर सुशिक्षित व्यक्ती एकत्र आल्या आहेत. त्यांनी माझं वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खांदेश्वर मंदिराजवळ असलेल्या जागेत हे वाचनालय सुरू करण्याची तयारी सुरू केली असून सिडकोने या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. या ठिकाणी जवळपास दहा हजार पुस्तके ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.वेगवेगळे अ‍ॅप्स, मोबाइल गेम्स आणि इंटरनेटच्या व्यापात मुलांना वाचनासाठी वेळ मिळत नाही. अनेक मुलं वाचन विसरली आहेत. या परिस्थितीत मुलांसाठी पुस्तकं प्रकाशित करून वाचन संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न मराठी प्रकाशक करीत आहेत. मात्र पुस्तकापासून मुलेच काय तर मोठी माणसेही दूर गेली आहेत. नोकरी, व्यवसाय, दैनंदिन कामे, जबाबदाऱ्या, यामुळे अनेकदा वाचन करण्यास वेळ मिळत नाही. थोडाफार वेळ मिळाला तरी पुस्तके उपलब्ध होत नाहीत.या कारणामुळे वाचन संस्कृती काही प्रमाणात लोप पावत चालली आहे. त्याचबरोबर अनेकांना वाचनाची आवड व इच्छा असते मात्र ती जोपासण्याकरिता जागा, वातावरण, शांतता आणि पुस्तकाचा अभाव असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून खांदा वसाहतीतील संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप, अलर्ट सिटीझन फोरम या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. यामध्ये विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ १०० पेक्षा जास्त सुशिक्षित व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण एकत्र येऊन विविध सामाजिक उपक्र म राबवतात. मध्यंतरी प्ले फॉर हेल्थ ही संकल्पना घेऊन या मंडळींनी चाळीस वर्षांवरील खेळांडूकरिता क्रि केटचे सामने भरवले होते. त्याचबरोबर खांदेश्वर मंदिराजवळ ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बाकडे बसवून देण्यात आले आहेत. आता या सर्वांनी एकत्र येऊन वाचनालयाचा उपक्र म हाती घेतला आहे.चार वर्षांपूर्वी खांदेश्वर मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले, त्यावेळी या ठिकाणी काही गाळे बांधण्यात आले होते. मात्र ते आजमितीला धूळखात पडून आहेत. त्याची धूळ झटकून तिथे सुसज्ज वाचनालय सुरू करण्याचा प्रस्ताव या तिन्ही संस्थांनी सिडकोकडे दिला आहे. याकरिता अंतिम मंजुरी मिळावी म्हणून लवकरच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची आम्ही भेट घेणार असल्याचे संजय भोपी यांनी सांगितले. येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे भोपी म्हणाले. (वार्ताहर) पुस्तक दिंडी काढणार : पुस्तक जमा करण्याकरिता लवकरच खांदा वसाहतीत पुस्तक दिंडी काढण्यात येणार आहे. वाचनालयाला पुस्तके द्यावीत, असे आवाहनही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घरोघरी जाऊन पुस्तक कलेक्शनही ही सर्व मंडळी करणार आहेत. ई -लायब्ररीची जोड : सध्या इंटरनेट व सोशल मीडियाचा जमाना असून त्यानुसार या ठिकाणी ई-लायब्ररी सुरू करण्याचा मानस संजय भोपी सोशल क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे. येथे लवकरच हा उपक्र म राबविण्यात येणार असल्याचे दत्ता कुलकर्णी म्हणाले.