प्रसाद पोतदार
मुंबई : इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त होत असते. त्यात आता एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाची भर पडली आहे. प्रचंड वेगाने विकसित होत असलेल्या ‘चॅटजीपीटी’सारख्या साधनांमुळे नजीकच्या काळात भाषा व्यवहारात एकूणच क्रांतिकारी बदल होणार असले तरी ‘मायमराठी’वर संक्रांत येणार नाही, अशी खात्री भाषातज्ज्ञांना वाटते.
अडीच हजार वर्षांची मराठी भाषा काळाच्या ओघात महारठ्ठी, मरहट्टी, महाराष्ट्री, मराठी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली गेली, विकसित झाली आणि टिकून आहे. तंत्रज्ञानामुळे स्वरूप बदलते; पण भाषा मरत नाही, हे सिद्ध झाले आहे.
मनुष्यजातीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान आले. क्रांतिकारक बदलानंतरही भाषा टिकून राहिली. काळाच्या प्रवाहात काही शब्द येतात आणि जातात; पण भाषा सुरूच राहिली आहे. त्यामुळे आता येत असलेल्या एआयच्या तंत्रज्ञानामुळेदेखील भाषेमध्ये काही फरक पडणार नाही. कोणतीही भाषा ही तंत्रज्ञानामुळे मरत नाही. परंतु, न्यूरॉलॉजिस्ट तज्ज्ञांच्या मते, माणसाच्या मेंदूमध्येच असे काही बदल होत आहेत, की त्यामुळे भविष्यात म्हणजे २०० ते ५०० वर्षांच्या काळात चिन्हभाषेचा वापर हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे श्राव्यभाषा कमी होऊन दृश्यभाषेचा वापर वाढेल. म्हणजेच श्राव्यभाषेची जागा दृश्यभाषा घेईल. त्याची चाहूल आता मोबाइलमुळे येऊ लागली आहेच.
डॉ. गणेश देवी, भाषातज्ज्ञ
एआय तंत्रज्ञानामुळे खूप बदल होतील. भाषेचे स्वरूप बदलेल. भाषा ही संवादाचे माध्यम आहे. एआयमुळे भाषेच्या थोडेसे पलीकडे जाऊन संवाद साधता येईल, असे माध्यम निर्माण होऊ शकते.
प्रा. रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिक
हा धोकाही संभवतो...
चॅटजीपीटी हे माणसाच्या मेंदूतून तयार झालेले टूल आहे. त्याला आपण काय देणार, यावरून ते आपल्याला काय आणि कसे देणार, हे ठरणार आहे.
सध्याचे याचे स्वरूप अत्यंत प्राथमिक स्वरूपात आहे. मात्र गुगल ट्रान्सलेटरचा अनुभव विचारात घेता या एआयच्या मॉडेलमधूनही भाषेच्या बाबतीत फार काही क्रांतिकारक बदल संभवत नाहीत. एक उत्तम गाईड म्हणून ते मार्गदर्शक ठरेल.
भाषेच्या विकासाला हे माध्यम पूरक ठरणार का, याचे ठोस उत्तर सध्या देता येत नाही. सध्याच्या कार्यपद्धतीवरून भाषेचा डौल, सौष्ठव लोप पावण्याचा धोका संभवतो. भाषा व्यवहारात मात्र याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल. उपयुक्त साधन, असे चॅटजीपीटीचे स्थान पक्के होईल.
मायमराठीचे वय २५०० वर्षे
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटात असलेला ब्राह्मी लिपीतील शिलालेख २,२२० वर्षांपूर्वीचा असून, तो मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे. या शिलालेखापूर्वी २००-३०० वर्षे मराठी भाषा अस्तित्वात असली पाहिजे.
चॅट जीपीटीला विचारले, मराठी भाषा उजळून निघेल का?
चॅट जीपीटीचे उत्तर
ज्ञानाचा प्रसार वाढेल, लेखन आणि सर्जनशीलता वाढीस लागेल, संवाद व शिक्षण सोपे होईल, मराठी व्यवसाय आणि संस्कृतीला चालना, मराठी भाषेचे जतन व वृद्धी होईल.
काही आव्हाने
एआयकडून मराठीचा शुद्ध आणि योग्य वापर व्हावा यासाठी प्रयत्न करावे लागतील.
स्थानिक बोलीभाषा आणि वैशिष्ट्ये जपण्याची गरज आहे.
सारांश – चॅटजीपीटीसारखी साधने योग्य वापरली, तर मराठी भाषेस उजाळा मिळण्याची संधी.