मुंबई : बरेचदा लोक म्हणतात की मला आणखी बरेच काही मिळायला हवे होते; पण माझ्या दृष्टीने समाजाने भरभरून दिलेले प्रेम हाच माझा सन्मान आहे, अशी भावना भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी शनिवारी व्यक्त केली.प्रियदर्शिनी अकादमीतर्फे के.सी. कॉलेजच्या सभागृहात पद्मविभूषण पुरस्काराबद्दल आडवाणी यांचा सत्कार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आडवाणी म्हणाले की, मला जीवनभर जनतेचे सहकार्य मिळाले. संसदेत मी दीर्घकाळापासून आहे आणि तिथेही सर्वपक्षीय खासदारांकडून मला मान आणि प्रेम मिळते. माझ्या दृष्टीने हे जीवनातील असे मोठे भांडवल आहे जे खचितच कोणाला मिळाले असावे.राज्यपाल राव यांनी आडवाणी यांचा उल्लेख ‘लोहपुरुष’ असा करून ते आपले आदर्श असल्याचे सांगितले. सिंधी समाजाने देशाच्या विकासासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. प्रियदर्शिनी अकादमीचे अध्यक्ष नानिक रूपानी, आडवाणी यांच्या कन्या प्रतिभा आदी उपस्थित होते. सिंधी समाजातील ज्येष्ठ उद्योगपती आणि समाजसेवेत मोठे योगदान देणारे पी.पी. छाबरिया, सुमन तुलसियानी आदींचा या वेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ गायक तलत मेहमूद यांच्या जीवनावर माणिक प्रेमचंद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आडवाणी यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रख्यात निवेदक अमिन सयानी, गायिका सुधा मल्होत्रा, तलत मेहमूद यांचे पुत्र खलिद, कन्या सबिना राणा आदी उपस्थित होते. तलत मेहमूद यांचा जीवनपट उलगडणारा एक लघुपट प्रतिभा आडवाणी यांनी तयार केला असून, या वेळी तो दाखविण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)
‘समाजाकडून मिळणारे प्रेम हाच माझा सन्मान’
By admin | Updated: May 17, 2015 02:02 IST