Join us  

...म्हणून माझ्या कुटुंबाला बहिष्कृत केलं होतं; भाई जगताप यांनी सांगितली ‘बंडखोर वृत्ती’मागची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 7:50 AM

‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात भाई जगताप यांची मुलाखत घेतली.

मुंबई : बालवयात जेव्हा बहिष्कृत शब्दाचा अर्थही माहिती नव्हता, तेव्हा आमच्या कुटुंबाला समाजाने बहिष्कृत केले होते. याच घटनेमुळे बहुतेक माझ्या स्वभावात बंडखोर वृत्ती तयार झाली. लहानपणी घडलेली घटना नकळत मनावर परिणाम करून गेली, असे मनोगत काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केले.

‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात भाई जगताप यांची मुलाखत घेतली. आयुष्यातील चढउतार आणि आजवरची वाटचाल, याबाबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘मी तिसरीत असताना आमच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं होतं. मी कुणाला हाक मारली, तरी मला प्रतिसाद द्यायचे नाहीत. सुरुवातीला वडिलांनी याबाबत बोलणं टाळलं. पण नंतर, आपल्या कुटुंबाला बहिष्कृत केल्याचं ते म्हणाले. तेव्हा बहिष्कृत या शब्दाचा अर्थही मला माहीत नव्हता’, अशी आठवण भाई जगताप यांनी सांगितली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वडील अध्यक्ष होते. बाबासाहेबांचे मूळ गाव आंबवडे आहे. ते जगासमोर यावे म्हणून वडिलांनी पुढाकार घेतला. परंतु त्यामुळेच लोकांनी आमच्या कुटुंबाला बहिष्कृत केले होते. बालवयात हे पटकन लक्षात आलं नाही; पण बालमनावर त्याचा परिणाम झाला. हे असं का? हा प्रश्न निर्माण झाला, असं ते म्हणाले. याच प्रसंगामुळे आपण सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

‘ती’ थप्पड आणि इंग्रजीत अव्वल नंबर!

सातवीपर्यंत चांगले गुण मिळवणारा मी आठवीत मुंबईच्या शाळेत दाखल झालो आणि पहिल्याच दिवशी धक्का बसला. इंग्लिशच्या शिक्षिका वर्गात आल्या. त्यांनी फळ्यावर जे लिहिलं होतं ते वाचायला सांगितले. मला इंग्लिश येत नव्हतं. हे पाहून त्या शिक्षिकेनं थाडकन माझ्या कानशिलात लगावली. आठवी वर्गात मी प्रमोट झालो होतो. पण, एक गोष्ट मनाशी पक्की केली होती. ज्या भाषेमुळे मला मार खावा लागला, ती भाषा व्यवस्थित शिकायची. त्यामुळे पुढील वर्षात इंग्लिश, गणित, विज्ञानात मी पहिला आलो होतो. आजही मी बऱ्यापैकी इंग्लिश बोलतो, असं भाई जगताप यांनी आवर्जून सांगितलं.

टॅग्स :अशोक जगताप