मुंबई : रिटेक हा एल एस रहेजा महाविद्यालयाचा बी.एम.एम., बी.ए.एम.एम.च्या विद्यार्थ्यांकडून होणारा वार्षिक अंतरमहाविद्यालयीन महोत्सव आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव यंदा व्हर्च्युल (आभासी) पद्धतीने साजरा होणार असून, यंदाच्या महोत्सवाची थीम ही व्हर्च्युल ग्रॅण्डस्टँड अशी असणार असून, प्रसिद्ध यू-ट्युबर्सवरती आधारित अशी असणार आहे. रिटेक यंदा २८ ते ३० जानेवारीच्या दरम्यान संपन्न होत आहे.
यंदाच्या रिटेक महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदाचा महोत्सव केवळ मुंबईतील महाविद्यालयांसाठी मर्यादित नसून पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर याचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये तीन स्पर्धांचा समावेश असणार आहे. त्यामध्ये लघुचित्रपट निर्मिती, छायाचित्रण आणि लघुकथालेखन अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-१९ काळातील सुरक्षेच्या कारणास्तव यंदा रिटेक ऑनलाइन साजरा होत असला तरी विद्यार्थ्यांची महोत्सवाची उत्सुकता नेहमीप्रमाणेच असून सहभागी स्पर्धक, विद्यार्थी यांची आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती आयोजक विद्यार्थ्यांनी दिली.
कोरोना काळात ज्या लोकांची अन्नान्नदशा झाली आहे. त्याचेसाठी रिटेकच्या विद्यार्थ्यांनी एक उपक्रम राबविला आहे. या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचा एक फ्रिज म्हणून संकल्पना राबविली असून, कोणीही गरजू व्यक्ती आपली भूक त्या फ्रिजच्या माध्यमातून भागवू शकणार आहे. वांद्रे व माटुंगा परिसरातील या खाद्यपदार्थांच्या फ्रिजच्या माध्यमातून माणुसकी अजूनही शिल्लक आहे या ब्रिदवाक्याची विद्यार्थी प्रत्येकाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक सुरक्षित अंतर, स्वच्छता अशा नियमांचे पालन करून ही संकल्पना राबविली जात आहे.