Join us

मस्ट - प्रजासत्ताकदिनी पार्ले टिळकचा एकात्मतेचा ज्ञानफुलोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईपार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन हा विशेष होता आणि शंभरी पूर्ण करत असलेल्या पार्ले टिळक मराठी शाळेच्या मैदानात पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांनी ज्ञानफुलोरा या संकल्पनेवर एकात्मतेचे प्रतीक म्हणून एकत्र येऊन तो साजरा केला हे यंदाच्या प्रजसत्ताक दिनाचे विशेष होते.

यंदा प्रजासत्ताकदिनी पार्ले टिळकमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व शाळांच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून ‘ज्ञानफुलोरा’ या संकल्पनेवर आधारित १०० प्रकारची सुमारे ५००० नैसर्गिक फुले आणि ८०० रोपांचा वापर करून शतक महोत्सवी वर्ष सूचित करणारी भव्य रचना केली होती. मागील दोन महिन्यांपासून त्याची तयारी चालू होती. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्प खोचून अभिनव पद्धतीने ‘ज्ञानफुलोरा’चे उद्घाटन करण्यात आले.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा अद्याप सुरू नसल्याने संचलनासाठी मुले शाळेत येऊ शकली नाहीत, म्हणून पा.टि.वि.अ.च्या पाचही शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी ध्वजवंदन करून संचलन केले. याप्रसंगी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संचालक मंडळ सदस्य अशा सुमारे ३०० जणांनी पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने दिलेली ‘हरित शपथ’ घेतली. ज्ञानफुलोरातील रोपे वापरून पा.टि.वि.अ.च्या पाचही शाळांमध्ये फुलबागा तयार करण्यात येणार आहेत. मुले जेव्हा शाळेत परत येतील तेव्हा ह्या फुलबागांमध्ये त्यांचे स्वागत करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे सहकार्यवाह हेमंत भाटवडेकर यांनी दिली.