Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताल सुरांच्या बरसातीत संगीतप्रेमी रमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमापासून मुकलेल्या संगीतप्रेमींना लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराच्या सोहळ्यात ताल-सुरांच्या आतषबाजीची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमापासून मुकलेल्या संगीतप्रेमींना लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराच्या सोहळ्यात ताल-सुरांच्या आतषबाजीची कसर भरून काढण्याची संधी मिळाली. ताज्या दमाच्या गुणी कलाकारांनी त्यांच्याकडील उत्तमोत्तम शैलींचे दर्शन घडवत ही संगीत मैफल संस्मरणीय केली.

संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याच्या उत्तर रंगात गाण्याची मैफल झाली. या मैफलीची सुरूवात झाली ती एस. आकाश, शिखर नाद कुरेशी, ओजस अढिया आणि रमाकांत गायकवाड यांच्या वादन जुगलबंदीने, त्यापाठोपाठ गायिका पूजा गायतोेंडे यांनी ‘भर दो झोली मेरी’ ही कव्वाली मोठ्या नजाकतीत पेश केली. गायिका अंकिता जोशी यांनी ‘गोविंद गोपाळ’ हे गीत तन्मयतेने सादर केले. गायिका आर्या आंबेकर यांनी ‘म्हारो प्रणाम’ आणि ‘अवघा रंग एक’ ही गीते सादर करून रसिकांचा दाद मिळवली.

यावर्षीचे लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेते प्रथमेश लघाटे यांनी पं. भीमसेन जोशी यांनी आदरांजली म्हणून ‘सावळे सुंदर’ हे भजन सादर केले. पुरस्कार विजेत्या गायिका हरगुन कौर यांच्या ‘आई भवानी तारसी भक्ताला’ या गीताने सोहळ्याची सांगता झाली.

सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम), सुखद मुंडे (पखवाज), सूर्यकांत सुर्वे (टाळ, मंजिरा), दीपक भट (ढोल), रत्नदीप जामसांडेकर (ढोलकी), नितेश सोनावणे (की-बोर्ड), विवेक राजगोपालन (मृदुंग), प्रसाद पाध्ये (तबला), मोहम्मद शादाब (ढोलक), शहनवाज अहमद (गिटार), संदीप मिश्रा (सारंगी) या कलाकारांनी वादन साथ केली. तर, विशाल जगताप, आदित्य नीला आणि आदिती गोसावी यांनी गायन साथ केली.