Join us

एक वर्षाने उघडणार म्युझिअम प्लाझा; भाऊ दाजी लाड संग्रहालयाची दुरुस्ती प्रक्रिया सुरुच

By स्नेहा मोरे | Updated: November 30, 2023 20:34 IST

पालिकेच्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयातील म्युझिअम प्लाझा दुरुस्तीच्या कारणांमुळे एक वर्षापूर्वी पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.

मुंबई - पालिकेच्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयातील म्युझिअम प्लाझा दुरुस्तीच्या कारणांमुळे एक वर्षापूर्वी पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे, संग्रहालयाचे देखील दुरुस्तीचे काम वर्षभरापासून सुरु आहे, अजूनही ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र आता वर्षभरानंतर अन्य शैक्षणिक , कलात्मक उपक्रमांसाठी संग्रहालयातील म्युझिअम प्लाझा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे.

डिसेंबर २०१२ साली डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या आवारात म्युझिअम प्लाझा सुरु करण्यात आले. या प्रांगणात टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा कलात्मक व सृजनशील वापर करुन दालन तयार करण्यात आले आहे. या प्रांगणात शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात, निसर्गाच्या सानिध्यात वेगळा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना मिळावी या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली होती. या दालनासह शैक्षणिक केंद्रही आहे, ज्या ठिकाणी लहानग्यांसह अगदी कुटुंबियांना एकत्रित कलात्मक कार्यशाळा, शिबिरांचा अनुभव घेता येतो.

मागील वर्षभरापासून संग्रहालयाच्या दुरुस्तीचेही काम सुरु आहे. या जतन संवर्धनाच्या प्रकल्पात बृहन्मुंबई महानगरपालिका, जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इनटॅक (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड हेरिटेज) यांच्यात करार करण्यात आला आहे.