Join us

मुरुडमध्ये राजकीय उलथापालथींना वेग

By admin | Updated: April 26, 2015 22:27 IST

मुरुड नगराध्यक्षपदाची निवडणूक ८ मे रोजी होणार आहे. त्यामुळे परिसरात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत

आविष्कार देसाई, अलिबागमुरुड नगराध्यक्षपदाची निवडणूक ८ मे रोजी होणार आहे. त्यामुळे परिसरात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. त्यातील प्राबल्य असणारा एक गट शिवसेनेकडे झुकला असून तो मुंबईत शिवसेना भवन येथे शुक्रवारी बैठकीसाठी गेल्याने भविष्यात नगर पालिकेवर भगवा फडकण्याचे संकेत आहेत.नोव्हेंबर २०११ साली मुरुड नगरपालिकेची निवडणूक झाली. कल्पना पाटील नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. ३० जुलै २०१४ रोजी त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांनी संपल्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आले. मात्र तेथे उमेदवार नसल्याने ते पद रिक्त राहिले. उपनगराध्यक्ष असलेले रहीम कबले यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी आली. अनुसूचित जमातीचे आरक्षण रद्द करुन दोन महिन्यापूर्वी नव्याने आरक्षण काढण्यात आले. इतर मागासवर्गीय स्त्री अथवा पुरुष असे आरक्षण पडले असून आता ८ मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या गटात कुरबुरी वाढल्याने महेश भगत आणि अविनाश दांडेकर अशी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. सध्या नगर पालिकेमध्ये राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक असून शिवसेनेचे दोन आणि शेकापचा एक सदस्य असे एकूण १५ सदस्य आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महेश भगत यांनी उघडपणे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा प्रचार केल्याचे लपून राहिलेले नाही.८ मे रोजी निवडणूक होणार असल्याने शिवसेनेकडे झुकलेल्या महेश भगत गटाने नगराध्यक्ष पद काबीज करण्यासाठी राजकीय व्यूहरचना आखली आहे. त्याला मूर्त रुप देण्यासाठी शुक्रवारी शिवसेना भवन येथे ते दाखल झाले होते. त्यांनी रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, शिवसेना नेते अनिल देसाई यांची भेट घेतली. संदीप पाटील, महेश भगत आदी नगरसेवक उपस्थित होते, अशी माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी लोकमतशी बोलताना दिली. वरिष्ठ नेत्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली असून नगर पालिकेवर भगवा फडकणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.