मुंबई : वक्तशीरपणात नेहमीच काठावर पास होणारी मध्य रेल्वे यंदा तर नापासच होण्याच्या मर्गावर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मध्य रेल्वेने वेळेच्या बाबतीत अधिक घोळ घातले आहेत. मेन लाइनला यात सर्वात कमी गुण मिळाले असून, हार्बर आणि ट्रान्स हार्बरने वक्तशीरपणात मेनला मागे टाकले आहे. गतवर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मध्य रेल्वेने वक्तशीरपणाच्या सरासरीत 88.28 टक्के गुण मिळवले होते. यंदा गाडी गडगडली असून, सरासरी गुण 85.91 टक्क्यांवर आले आहेत.
रेल्वे रुळांना तडा जाणो, सिग्नल आणि ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, लोकलमध्ये बिघाड या कारणांमुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर लाइनवरील लोकल गेल्या सहा महिन्यांपासून सतत उशिराने धावत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मध्य रेल्वे रुळावर यावी यासाठी रविवारी विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जात असतानाच शनिवारीही मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरच रेल्वे विस्कळीत होण्याच्या घटना घडत असून, त्यामानाने हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर कमी घटना घडल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेचा 91.14 टक्के वक्तशीरपणा होता. तर या वर्षातील एप्रिल महिन्यात 86.85 टक्के वक्तशीरपणा आहे. परंतु हा वक्तशीरपणा हळूहळू कमी होत गेला आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 87.50 टक्के असलेला वक्तशीरपणाही यंदाच्या वर्षी 85.91 टक्क्यांवर आला आहे. (प्रतिनिधी)