Join us

‘मरे’चे प्रगतिपुस्तक कोरेच

By admin | Updated: November 14, 2015 02:47 IST

खचाखच भरलेल्या लोकल आणि गर्दी असतानाही लोकल डब्यात शिरण्यासाठी प्रवाशांकडून होत असलेला प्रयत्न पाहता लोकल आणि त्याच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार कधी

मुंबई : खचाखच भरलेल्या लोकल आणि गर्दी असतानाही लोकल डब्यात शिरण्यासाठी प्रवाशांकडून होत असलेला प्रयत्न पाहता लोकल आणि त्याच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार कधी, असा प्रश्न मध्य रेल्वे प्रवाशांना पडतो. गेल्या तीन वर्षांत मध्य रेल्वेच्या लोकल आणि फेऱ्यांमध्ये वाढ झालीच नसल्याने त्यांचे ‘प्रगतिपुस्तक’ कोरेच राहिले आहे. यातही हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेला मोठा फटका बसला असून, फेऱ्या तसेच लोकलमध्ये वाढ झालेलीच नाही. तर यामध्ये मेन लाइनवरील प्रवाशांना थोडेफारच समाधान मिळाले आहे. मध्य रेल्वेमार्गावरून दिवसाला जवळपास ४२ लाख ते ४५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. हा प्रवास करणे जिकिरीचे झाले असून त्यामुळे लोकल आणि फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतु त्याकडे गांभीर्याने मध्य रेल्वेकडून बघितले जात नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत मध्य रेल्वेवरील मेन लाइन सोडता हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर एकाही नवीन लोकल आणि फेऱ्यांची भर पडलेली नाही. २0१२-१३ मध्ये १२१ लोकलच्या १ हजार ६१८ फेऱ्या होत होत्या. मात्र त्यानंतर २0१३-१४ आणि २0१४-१५ मध्ये अजिबात वाढ झालेली नाही. लोकलही तेवढ्याच आणि फेऱ्याही तेवढ्याच राहिल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. २0१२-१३ मध्ये मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर ४0 जादा फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या दोन वर्षांत मेन लाइनवर फेऱ्यांमध्ये वाढच नाही. तर हार्बर व ट्रान्स हार्बर रेल्वे प्रवासी ३ वर्षे यापासून वंचित राहिले. मध्य रेल्वेवर एकूण प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ही वाढत गेली. परंतु लोकल आणि फेऱ्यांमध्ये काही वाढ झाली नाही. २00९-१0 साली १४ हजार ७७८ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती. २0१0-११ साली हीच क्षमता १६ हजार ५८५ एवढी झाली. तर २0११-१२ मध्ये ती वाढून १६ हजार ९५३ क्षमता एवढी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर २0१२-१३ साली १७,७१५ प्रवासी क्षमता झाल्यानंतर २0१४-१५ पर्यंत ही क्षमता तेवढीच राहिली.