Join us  

मोबाइल लुटीच्या उद्देशाने तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 12:49 AM

दीड हजार रुपयांच्या मोबाइल चोरीसाठी आग्रीपाडामध्ये शकील सय्यद अली या तरुणाची हत्या झाल्याची माहिती आरोपीच्या चौकशीतून उघड झाली आहे.

मुंबई : दीड हजार रुपयांच्या मोबाइल चोरीसाठी आग्रीपाडामध्ये शकील सय्यद अली या तरुणाची हत्या झाल्याची माहिती आरोपीच्या चौकशीतून उघड झाली आहे. हत्येबाबत कोणतेही धागेदोरे नसताना, आग्रीपाडा पोलिसांनी शिताफीने आरोपीला दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. राजबाबू कोयले मन्सुरी (२२) असे अटक आरोपीचे नाव आहे.नायर रोड येथील हैदर सय्यद यांच्या फर्निचरच्या गोडाऊनमध्ये शकील साफसफाईचे काम करायचा. ३० तारखेला हैदर हे गोडाऊनमध्ये गेले असता, त्यांना एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मतदेह आढळला. त्यांच्याकडून आग्रीपाडा पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात तो मृतदेह शकीलचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. या वेळी आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज हेगिष्टे, साहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कुदळे आणि अंमलदारांनी शोध सुरू केला. तपासात शकील यांच्याकडील मोबाइलही गायब झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन तपासले असता, त्याचा मोबाइल महालक्ष्मी आल्यानंतर बंद झाला. तपास पथकाने खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला तेव्हा मन्सुरीला शकीलसोबत अखेरचे बघितल्याचा धागा पोलिसांना मिळाला.मन्सुरी हा फुटपाथवरच राहायचा. त्यामुळे त्याचा कुठलाच ठावठिकाणा नव्हता. मात्र त्याच्याच तपासातून हत्येचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याने पोलिसांनी मुंबईसह अन्य ठिकाणी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या नातेवाइकांकडे शोध घेत असताना, तो दिल्लीतील एका नातेवाइकाकडे लपून बसल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे तपास पथकाने दिल्लीतून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत केवळ मोबाइल लुटीच्या उद्देशाने २५ नोव्हेंबर रोजी त्याची शकीलसोबत झटापट झाली. याच रागात त्याने त्याची हत्या केली.