विरार : व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच विरार रेल्वे उड्डाणपुलावर एका माथेफिरूने भरदिवसा आपल्याच मित्राची चाकूने वार करून हत्या केली. त्यानंतर हा माथेफिरू रक्ताळलेला चाकू घेऊन प्रवाशांच्याही अंगावर धावत सुटल्याने एकच घबराट पसरली होती. पोलिसांनी त्याला तत्काळ जेरबंद केले. महेश पाल (२६) असे आरोपीचे नाव असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मजुरी करणारा महेश दहिसर चेकनाका येथे राहतो. सोमवारी सकाळी महेश आपल्या एका मित्रासोबत जीवदानी देवीच्या दर्शनाला आला होता. दर्शन आटोपून सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघेही विरार रेल्वे पादचारी पुलावरून लोकल पकडण्यासाठी निघाले होते. पण, पुलावरच दोघांमध्ये वाद होऊन जोरदार भांडण सुरू झाले. त्यानंतर चवताळलेल्या महेशने स्वत:जवळील चाकू काढून मित्रावर सपासप वार केले. पुलावर खूपच गर्दी होती. महेशने अचानक केलेल्या हल्ल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरून पळापळ सुरू झाली. १५ मिनिटे सुरू असलेल्या थरारनाट्याने अनेकांची पाचावर धारण बसली होती. अमित चंदनशिवे, योगेश देशमुख आणि सागर बरोडकर या पोलिसांनी महेशला ताब्यात घेतले.
विरारमध्ये रेल्वे पुलावर हत्या
By admin | Updated: April 12, 2016 03:14 IST