Join us

नशा करण्यासाठी ५०० रुपये घेतल्याच्या रागात एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:06 IST

वर्सोवा पोलिसांकडून आठ तासांत आरोपी गजाआडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नशा करण्यासाठी ५०० रुपये बळजबरीने घेतल्याच्या रागात विक्रम ...

वर्सोवा पोलिसांकडून आठ तासांत आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नशा करण्यासाठी ५०० रुपये बळजबरीने घेतल्याच्या रागात विक्रम निशाद याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी शुक्रवारी अवघ्या ८ तासांत तपासाअंती मारेकऱ्यांना गजाआड केले.

वर्सोवा गाव परिसरात १६ एप्रिल, २०२१ रोजी निशादचा मृतदेह आढळला. दुर्गम खाडीलगत त्याची हत्या झाल्याने, तसेच घटनास्थळी कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने मृताची ओळख पटवणे व आरोपीचा शोध घेणे अवघड होते. निशादच्या गळ्यावर, छातीवर व पोटावर धारदार शस्त्राने निर्घृणपणे वार करण्यात आले होते.

वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केदारी पवार, संग्रामसिंग पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. मृताच्या शरीरावरील गोंदणावरून निशादची ओळख पटली. आरोपींबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती अथवा पुरावा नव्हता, तरीही वर्सोवा पोलिसांनी कौशल्याने आरोपींबाबत माहिती गोळा करून शिन्या महादेव मंदिर परिसरातून आरोपी संदीप रॉय (२५) आणि घनश्याम दास (५०) यांना ताब्यात घेतले. निशादने नशा करण्यासाठी घनश्यामकडून जबरदस्तीने ५०० रुपये घेतले होते. त्याचा राग मनात धरून चाकूने भोसकून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.

..........................