Join us

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून हत्या, पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 06:25 IST

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री कांदिवलीमध्ये घडली.

मुंबई : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिची हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री कांदिवलीमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.मोहम्मद रकीब खान (४६) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याचा भंगाराचा व्यवसाय आहे. तो कांदिवलीच्या गांधीनगर परिसरात पत्नी अजमतउनीसा (४०) सोबत राहत होता. या जोडप्याला सहा मुली आहेत. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय खानला होता. त्यावरून त्यांच्यात सतत भांडण व्हायचे. सोमवारी रात्री मुली झोपल्यानंतर खानने तिला तिच्या संबंधांबाबत विचारणा केली, तसेच त्या व्यक्तीचे नाव तो तिला विचारत होता. मात्र ती निर्दोष असून या आरोपात काहीच तथ्य नाही, असे ती त्याला वारंवार सांगत होती. खानला तिच्यावर विश्वास नव्हता. त्याने तिच्या तोंडावर बुक्का मारत रस्सीने गळा आवळत तिला ठार मारले. स्वत:च पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करत माहिती दिली. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खानला अटक केली.पूर्वी खानचे नागपूरमध्ये भंगाराचे दुकान होते. मात्र दोन वर्षांपूर्वी तो पत्नी आणि मुलींना घेऊन मुंबईत आला. पत्नीचे शेजारच्या दुकानातील भंगारवाल्यासोबत संबंध असल्याचा संशय खानला होता. याच संशयातून त्याने बायकोचे आयुष्य संपविले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले.