मुंबई : तीन वर्षे सोबत राहिल्यानंतर लग्नास नकार देणा-या प्रेयसीची प्रियकराने आपल्या साथीदाराच्या मदतीने हत्या केली. हत्येनंतर ती आत्महत्या भासावी असा आभास निर्माण केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी प्रियकराला गजाआड केले. सविता मंगल वर्मा (१८) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. २२ जानेवारीला ती मालाड येथील घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल हाती पडल्यानंतर मात्र मालवणी पोलिसांना धक्का बसला. सविताची गळा आवळून हत्या झाल्याचे निरीक्षण पुढे येत होते. तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सविताबाबत माहिती गोळा केली. तेव्हा तिचे प्रेमप्रकरण समोर आले.तीन वर्षांपासून सविताचे मुकेश वर्मा या तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. हे दोघे सोबत राहत होते. २१ जानेवारीला मध्यरात्री सविता, तिची आई, लहान बहीण, मुकेश, त्याचा चुलत भाऊ सतीश असे जीवदानीला गेले. तेथे आईने सविता व मुकेशच्या लग्नाला विरोध केला. रागाच्या भरात मुकेशने सविताच्या आईला शिवीगाळ केली. यामुळे सविता बिथरली. सकाळी सर्वच सविताच्या घरी परतले. तेव्हा लग्नावरून मुकेशने सर्वांसोबत वाद घातला. यानंतर सविताने लग्नास विरोध केला. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी मुकेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सविताच्या हत्येची कबुली दिली.मुकेशने चुलत भाऊ सतीशच्या मदतीने सविताच्या हत्येचा कट आखला. त्याने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केली. संशय येऊ नये म्हणून सविताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी मुकेशला अटक करून सतीशचा शोध सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
लग्नास नकार देणा-या प्रेयसीची हत्या
By admin | Updated: January 31, 2015 02:37 IST