Join us

मुर्शी गावचा सुपुत्र बनलाय नवी मुंबईचा उपमहापौर

By admin | Updated: May 11, 2015 23:49 IST

अविनाश लाड : साखरप्याच्या विकासाकडेही लक्ष देणार

शोभना कांबळे -रत्नागिरी -दुर्गम भागात असलेल्या मुर्शी (ता. संगमेश्वर) गावचे सुपुत्र अविनाश शांताराम लाड यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाली आहे. त्याच्या निवडीबद्दल साखरपा परिसरातून आनंद व्यक्त होत आहे.लाड यांचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले असले तरी त्यांची नाळ कायमस्वरूपी गावाला जोडलेली राहिली. त्यामुळे गावाच्या ओढीने त्यांचा संपर्क गावाशी सातत्याने राहिला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्यात नेतृत्व करण्याचा गुण कायम राहिला.पुढे ते काँगेस पक्षात सक्रिय झाल्याने युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ झाला. २००० साली ते पहिल्यांदा नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक झाले. तेव्हापासून आतापर्यंत ते चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २०१० साली त्यांची पत्नी प्रणाली या महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अविनाश लाड हे आता उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. बालपणापासून मुंबईत वास्तव्य असलं तरी अविनाश लाड हे प्रत्येक महिन्याला गावाला येतात. इथे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवतात. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी या भागातील रस्ते, धरणे, पाणी संदर्भातील समस्या मार्गी लावल्या आहेत. गावातील मुलांना शिक्षणासारख्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. साखरप्यातील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय तसेच राजापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतही त्यांचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे.आतापर्यंत आपले राजकीय कार्य मुंबईत अधिक प्रमाणात असले तरी यापुढेही या भागाकडे अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे लाड यांनी लोकमतला सांगितले. गावाच्या ओढीने लाड यांचा सतत गावाशी संपर्क असतो. त्यामुळे या भागाचा विकास करण्याकडे आपण कायम लक्ष पुरवू, असे त्यांनी सांगितले. लाड यांच्या पत्नी प्रणाली याही राजकारणात सक्रिय असून, त्या २०१० साली मुंबईत महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या.